Advertisement

गोराईत अग्निशमन केंद्रासाठी एस्सेल वर्ल्डकडून जागा

गोराईमध्ये अग्निशमन केंद्रासाठी एस्सेल वर्ल्डने जागा देऊ केली आहे. त्यानंतर अाता एस्सेल वर्ल्डच्या वाहनतळ परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधितांना दिले आहेत.

गोराईत अग्निशमन केंद्रासाठी एस्सेल वर्ल्डकडून जागा
SHARES

 गोराईत नेहमी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, याठिकाणी अग्निशमन केंद्र नाही. आपत्कालीन परिस्थिती किंवा दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाअभावी परिस्थिती अाणखी बिकट होऊ शकते.  त्यामुळे याठिकाणी अग्निशमन केंद्रासाठी आता एस्सेल वर्ल्डने जागा देऊ केली आहे. त्यानंतर अाता एस्सेल वर्ल्डच्या वाहनतळ परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधितांना दिले आहेत.


पाणीप्रश्नावर  निर्देश 

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मालाड ते दहिसर आदी भागातील परिमंडळ ७ अंतर्गत गोराई परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी गोराईतील ज्या आदिवासी पाड्यांच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही, त्या परिसरांसाठी २ पिण्याच्या पाण्याचे टँकर दररोज पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच या परिसरात बोरिवलीपासून गोराईपर्यंत पाण्याची जलवाहिनी टाकून हा प्रश्न कायमचा सोडविण्याच्या दृष्टीने उपलब्ध पर्यायांची पडताळणी करुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

प्रसुतीगृहासाठी  भू-वापर बदलणार

गोराई व्हिलेजमधील केवळ ४ वर्ग खोल्या असणाऱ्या मनपा शाळेलादेखील आयुक्तांनी भेट दिली. या ठिकाणी ५ मजली शाळेच्या (तळमजला+ ४) प्रस्तावित आराखड्यानुसार शाळा बांधकामाच्या कार्यवाहीला सुरुवात करावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. गोराई परिसरातील एक भूखंड हा शाळेसाठी राखीव आहे. मात्र, या परिसरात प्रसुतीगृह व दवाखान्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन सदर भूखंडाचा भू-वापर बदलण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यासह सदर भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरु करावी, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले.


अत्याधुनिक शौचालय होणार

तसेच गोराई समुद्र किनाऱ्याजवळच्या शौचालयाची अवस्था लक्षात घेता, सदर परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त शौचालयाच्या बांधकामाची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे आदेशही या दौ-यादरम्यान देण्यात आले. यावेळी नगरसेविका श्वेता कोरगावकर, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी, उपायुक्त अशोक खैरे, आर मध्य विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर आदी उपस्थित होते.



हेही वाचा - 

चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट, २१ जण जखमी

तुमचं काम सिनेमा दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे - न्यायालय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा