Advertisement

देशातल्या पहिल्या सिग्नल शाळेचा निकाल पहिल्याच वर्षी ९९ टक्के!


देशातल्या पहिल्या सिग्नल शाळेचा निकाल पहिल्याच वर्षी ९९ टक्के!
SHARES

रस्त्यावर मोगरा, चाफा, खेळणी, पुस्‍तके विकणाऱ्या, भिक मागणाऱ्या तीन हात नाका सिग्‍नलवरील मुलांसाठी ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्‍यासपीठ संस्‍थेने सिग्नल शाळा सुरू केली होती. या सिग्‍नल शाळेचा पहिला निकाल शनिवारी जाहीर झाला. आणि विशेष म्हणजे पहिल्‍याच वर्षी सिग्‍नल शाळेचा निकाल 99 टक्‍के लागला आहे. पहिली ते आठवी इयत्‍तेतल्या अठरा मुलांपैकी 17 मुले उत्तीर्ण झाली आहेत.

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि समर्थ भारत व्‍यासपीठ यांच्‍या पुढाकाराने येथील तीन हात नाका पुलाखाली देशातली पहिली सिग्‍नल शाळा गेल्‍या शैक्षणिक वर्षात सुरू झाली. शिक्षणाच्‍या मूळ प्रवाहापासून वंचित झालेली, शाळा सोडलेली, कधीही शाळेत न गेलेली पहिली ते आठवी इयत्‍तेतली 17 आणि पूर्व प्राथमिक गटातील 11 अशी एकूण 28 मुले सिग्‍नल शाळेत शिक्षण घेत आहेत. मागील शैक्षणिक वर्षाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात पहिलीतील 2, इयत्‍ता दुसरीतील 1, इयत्‍ता तिसरीतील 2, इयत्‍ता चौथीतील 5, इयत्‍ता पाचवीतील 3, इयत्‍ता सहावीतील 2 तर इयत्‍ता आठवीतील 2 असे एकूण 17 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले असून इयत्‍ता सातवीतील एक विद्यार्थिनी मूळ गावी स्‍थायिक झाल्‍यामुळे ती परीक्षेला बसू शकली नसल्‍याने अनुत्तीर्ण झाली.

यंदाच्‍या पहिल्‍याच शैक्षणिक वर्षात सिग्‍नल शाळेचा निकाल 99 टक्‍के इतका लागला आहे. सिग्‍नल शाळेच्‍या या निकालाची दखल घेत आयुक्‍त संजीव जयस्‍वाल यांनी दूरध्‍वनीवरुन मुलांचे कौतुक केले आणि त्‍यांना नव्‍या शैक्षणिक वर्षासाठीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. तसेच महापौर मिनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल दोघेही मुलांचे विशेष कौतुक करणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय