Advertisement

आता मालमत्ता कर फ्लॅटवर लागणार, इमारतीवर नाही!


आता मालमत्ता कर फ्लॅटवर लागणार, इमारतीवर नाही!
SHARES

मुंबईतील प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र मालमत्ता कराची आकारणी करून देयके पाठवण्याची नगरसेवकांची मागणी आता प्रत्यक्षात साकारत आहे. १ एप्रिल २०१८पासून भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) मिळालेल्या इमारतीतील प्रत्येक सदनिका धारकाला स्वतंत्र मालमता कर आकारून देयके पाठवली जाणार आहेत. मात्र, नवीन इमारतींना या योजनेचा लाभ दिला जात असला, तरी ज्या जुन्या इमारतींनी १०० टक्के कर भरलेला असेल आणि त्या इमारतीच्या प्रत्येक सदनिकांची कागदपत्रे सोसायटीने उपलब्ध करून दिल्यास जुन्या इमारतींनाही सदनिकानिहाय मालमत्ता कर आकारला जाणार आहे.


इतर सेवांचा लाभ घेण्यात अडचणी

मुंबईकरांना दिल्या जाणाऱ्या नागरी सेवांबद्दल महापालिकेकडून नागरिकांना मालमत्ता कर आकारला जातो. हा मालमत्ता कर सदनिकानिहाय न करता संपूर्ण इमारतीला आकारला जातो. परिणामी इमारतींचा मालमत्ता कर सोसायटीकडून भरला जात नसल्याने अनेकदा वाद निर्माण व्हायचा आणि या थकीत मालमत्ता बिलाच्या रकमेपोटी सदनिका धारकांना इतर सेवांचा लाभ घेण्यात अडचणीत यायच्या. त्यामुळे या मालमत्ता कराची देयके सदनिकानिहाय पाठवून कराची आकारणी केली जावी, अशा मागणीचा ठराव महापालिका सभागृहाने केला होता. शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली होती.


दंड टाळणे होणार शक्य!

या निर्णयामुळे मालमत्ता कर भरण्यासाठी सोसायटीवर अवलंबून न राहता फ्लॅटधारकांना स्वतंत्रपणे मालमत्ता कर भरणे शक्य होणार आहे. तसेच सोसायटीने मालमत्ता कर उशीरा भरल्याने लागणारा दंड किंवा होणारी महापालिकेची कारवाई टाळणेही शक्य होणार आहे. त्याचबरोबर लवकर मालमत्ता कर भरल्यास 'अर्ली बर्ड डिस्काऊंट' सारख्या सुविधांचा लाभही अधिक सुलभपणे मिळणे शक्य होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.


बिल्डरसोबतचा वाद टळणार

अनेकदा नवीन सोसायटी व विकासकामध्ये मालमत्ता कर कुणी भरायचा? याविषयी उद्भवणाऱ्या वादाबाबत पालिकेची भूमिका स्पष्ट करताना डॉ. मुखर्जी म्हणाले की, "आता विकल्या न गेलेल्या सदनिका वा गाळ्यांचा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी संबंधित बिल्डरची असणार आहे. तर विक्रीनंतर मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी संबंधित सदनिका तथा गाळेधारकाची असणार आहे".


कॉमन अॅमेनिटीजचं काय?

सामायिक उपयोगाच्या भागांबाबतचे (कॉमन एमेनिटीज) मालमत्ता करदेयक मात्र सोसायटी झाली असल्यास सोसायटीच्या नावे दिले जाईल. सोसायटी झाली नसल्यास संबंधित देयक विकासकाच्या नावाने दिले जाईल.


आकडेवारी काय सांगते?

  • २ लाख ७५ हजार करपात्र इमारती
  • २८ लाख सदनिका / गाळे
  • १ लाख ४२ सदनिकाधारकांचे स्वतंत्र देयकासाठी अर्ज
  • १०० ते १२५ नव्या इमारतींना आकारला जातो मालमता कर



हेही वाचा

महापालिकेची ५,१३२ कोटींची मालमत्ता कर वसुली


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा