Advertisement

मुंबईत पूर येणार की नाही, हे आधीच कळणार!

या पूरपरिस्थितीचे पूर्वानुमान देणारी प्रणाली पुढील पावसाळ्यात कार्यरत होणार आहे.

मुंबईत पूर येणार की नाही, हे आधीच कळणार!
SHARES

मुंबईसह उपनगरातील सखल भागांत पावसाळ्यात जास्तीचा पाऊस झाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. पाणी साचल्यामुळं पूरस्थिती निर्माण होते. तसंच, रस्ते व लोकल वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळं या पूरपरिस्थितीचे पूर्वानुमान देणारी प्रणाली पुढील पावसाळ्यात कार्यरत होणार आहे. मुंबईतील हवामानाच्या नोंदी, नद्यांची पातळी, भरती-ओहोटी, भूभागाच्या नोंदी आणि पावसाचं पूर्वानुमान याआधारे पुराचं पूर्वानुमान देणारी यंत्रणा विकसित केली जाणार असून, पुढील पावसाळ्यात त्याचा वापर करता येणार आहे.

पूरपरिस्थितीचं पूर्वानुमान

नद्या, भौगोलिक परिस्थिती, तलाव, पाणी साचणारी ठिकाणं, समुद्राला येणारी भरती ओहोटी या नोंदीचा वापर यामध्ये केला जाणार आहे. मुंबईत पडलेल्या पावसाच्या नोंदी आणि पूर्वानुमान यांचा मेळ या इतर नोंदीशी घालून ६ ते ७२ तासांतील संभाव्य पूरपरिस्थितीचं पूर्वानुमान देता येणार आहे. यामध्ये ‘जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅपिंग’ (जीआएस) प्रणालीचा वापर होणार आहे. मुंबईकरांना हे पूर्वानुमान अ‍ॅपच्या माध्यमातून पाहता येणार असून, दर १५ मिनिटानं अद्ययावत केलं जाणार आहे.

यंत्रणा विकसित

चेन्नई शहरासाठी अशा प्रकारची प्रणाली आयआयटी मुंबई, चेन्नई आणि हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांच्या चमूनं विकसित केली आहे. त्याच धर्तीवर मुंबईसाठी देखील अशीच यंत्रणा विकसित करण्याचं काम हवामान विभाग, मुंबई महापालिकेतर्फे सुरू आहे.

'सी बॅण्ड' रडार

येत्या ३ महिन्यांत मुंबईत वेरावली, गोरेगाव इथं 'सी बॅण्ड' रडार बसवण्यात येणार आहे. सुमारे ५०० मीटपर्यंतच्या हवामानातील बदलांचा वेध यामार्फत घेतला जाणार आहे. त्यासाठी जागा उपलब्ध झाली असून, त्या ठिकाणी बांधकाम सुरू असून हे रडार इस्रोच्या माध्यमातून बसवण्यात येणार आहे.

ढगांचा वेध

'सी बॅण्ड' रडार हे चक्रीवादळाबरोबरच गडगडाट करणाऱ्या ढगांचादेखील वेध घेणार आहे. तसंच, मुंबईसाठी ४ 'एक्स बॅण्ड' रडार येणार असून, पुढील पावसाळ्यापूर्वी एक 'एक्स बॅण्ड' रडार कार्यरत होणार आहे. तर उर्वरित ३ रडार त्यानंतरच्या ३-४ महिन्यात कार्यरत होणार आहे. ‘एक्स बॅण्ड’ रडार प्रामुख्यानं गडगडाटासह पाऊस पाडणाऱ्या ढगांचा वेध घेण्याचं काम करणार आहे.



हेही वाचा -

साध्या लोकललाही स्वयंचलित दरवाजे, पश्चिम रेल्वेचा निर्णय

पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा