दादरमध्ये कचऱ्याच्या दुर्गंधीने प्रवासी त्रस्त

 Dadar
दादरमध्ये कचऱ्याच्या दुर्गंधीने प्रवासी त्रस्त

दादर रेल्वे स्थानकाकडील फुलमार्केटमधून जात असताना पब्लिक ब्रिजच्या कोपऱ्यात अनेक दिवसांपासून कचरा तसाच पडून आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून या ठिकाणचा कचरा उचललाच न गेल्यामुळे या कचऱ्यात किडे झाल्याचे पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पावसामुळे हा कचरा भिजला असून, यातून आता दुर्गंधी देखील येत आहे. त्यामुळे या दुर्गंधीचा त्रास प्रवाशांसह इथे बसणाऱ्या विक्रेत्यांना देखील होत आहे. त्यातच या ठिकाणचा नवीन पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद केल्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना गर्दीसोबतच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. 'पावसाच्या पाण्यामुळे भिजलेला हा कचरा महापालिकेने उचलावा,' अशी मागणी प्रवासी करत आहेत.

विशेष म्हणजे वर्ष होत आले तरी देखील फूल मार्केटमधील पूल दुरुस्त न झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच भाजीवाले, फेरीवाले, कचरा आणि घाणीने रेल्वे स्थानकाबाहेरची जागा व्यापल्यामुळे लोकांना प्रवासातून आल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर पडणे त्रासदायक होत आहे.

महापालिकेने अनेक दिवसांपासून पब्लिक ब्रिज बंद केला आहे. त्यातच आता पावसाळ्यात  रेल्वे स्थानकाबाहेर स्वच्छता न ठेवल्यामुळे दुर्गंधीदेखील पसरली आहे. रेल्वे स्थानकाबाहेर अपुरी जागा असताना त्यातच ब्रिज बंद, यामुळे येथे गर्दीचे प्रमाण अधिक असते. त्यात रेल्वे स्थानकाबाहेर कचऱ्याची दुर्गंधी, हे सर्व त्रासदायक वाटत आहे. त्यामुळे महापालिकेने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
- संदेश कदम, प्रवासी

दादरइतकी गर्दी दुसऱ्या कोणत्याही रेल्वे स्थानकात होत नाही. एवढे लोक दररोज प्रवास करत असतात, पण तशा सुविधा या रेल्वे स्थानकात नाहीत. स्वच्छतेचे तर नावच नाही. त्यातच एक पब्लिक ब्रिज बंद असल्यामुळे ये जा करणाऱ्यांची गर्दी सहन होण्यापलीकडे असते. पब्लिक ब्रिजवर चालण्यासाठी जागा नसते. तिथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. गेल्या 2-3 महिन्यात हा कचरा रेल्वे स्थानकाबाहेर पडून आहे. पाऊस पडल्यामुळे या कचऱ्याचा वास यायला सुरुवात झाली आहे. हा कचरा पालिकेने उचलला नाही, तर कचऱ्यामुळे आजार पसरण्याची देखील शक्यता आहे.

- मंगेश मेस्त्री, प्रवासी


हेही वाचा - 

कधी पूर्ण होणार दादर फूल मार्केटच्या ब्रिजचे काम?


Loading Comments