Advertisement

अतिरिक्त आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची महापालिका सभागृहाची मागणी


अतिरिक्त आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची महापालिका सभागृहाची मागणी
SHARES

घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महापालिका सभागृहात उमटले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असला तरी या अनधिकृत नूतनीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित सहायक अभियंता आणि सहायक आयुक्तांना निलंबित करून त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये एफआयआर दाखल करण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली आहे. या अधिकाऱ्यांसोबतच अतिरिक्त आयुक्तांवरही कारवाई करण्याची मागणी सभागृहाने केली आहे.


अनधिकृत बांधकामाला कोणाचे पाठबळ

घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून अजुनही दोन व्यक्ती बेपत्ता आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर शितप नर्सिंग होमच्या नूतनीकरणाच्या नावाखाली केलेल्या फेरबदलामुळे ही इमारत कोसळली असल्याचा आरोप करत स्वत:च्या स्वार्थासाठी ही इमारत पाडली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे केला. या अनधिकृत बांधकामाला कोणाचे पाठबळ होतं असा  सवाल करत जाधव यांनी याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.


प्रशासनाचे कान बंद होते का?

आरसीसी बांधकाम तोडतानाचा आवाज प्रशासनाच्या कानापर्यंत गेला नाही का? त्यावेळी कानासमोर कोणत्या रंगाचा कागद धरला होता, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेचे दिलीप लांडे यांनी श्रेयस सिनेमापासून ते पवईपर्यंत या शितप नावाच्या व्यक्तीने अनधिकृत बांधकामे आहेत. त्यासर्वांची चौकशी केली जावी, अशी मागणी केली.


अधिकाऱ्यांना निलंबित करा

सुनील शितप यांने लोकांना रिव्हॉल्वरने धमकावले असल्याचे वृत्तपत्रांतून छापून आले आहे, याचा दाखला देत  विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी इमारत दुर्घटना रोखण्यासाठी आता आपल्याला सर्वांना काम करावे लागणार आहे. परंतु या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सहायक आयुक्त आणि सहायक अभियंता यांच्याविरोधात पोलिसांमध्ये एफआयआर दाखल करण्यात यावे तसेच त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.


अंतर्गत फेरबदल केलेल्या इमारतींची तपासणी

कायद्याच्या रक्षकांनी आपले काम करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. परंतु आपण आपले काम कधी करणार असा सवाल भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी महापौरांना केला. त्यामुळे यापुढील सात ते दहा दिवसांमध्ये जेवढ्या जुन्या इमारती आहेत, त्यामध्ये जर काही बदल झाले असतील तर त्यांची पाहणी करून त्यांना नोटीस दिली जावी,अशी सूचना कोटक यांनी केली. सी१ प्रवर्गातील अनेक इमारती आपण अद्यापही खाली करू शकलो नाहीत. पुढील काळात धोकादायक इमारती आणि अंतर्गत फेरबदल करून इमारतींना धोकादायक बनवलेल्या इमारतींमधील लोकांचे जीव वाचवण्यासाठी महापालिकेने ही मोहिम हाती घ्यावी. परंतु ही मोहिम प्रामाणिकपण राबवली जावी. नाहीतर इथे आमच्या नावाचे दाखले देत अशाप्रकारची पाहणी केली जाईल आणि पाहणीच्या नावाखाली लोकांची लूट केली जाईल,असे प्रकारे होता कामा नये,असा इशाराही त्यांनी दिला.


धारावी झोपडपट्टीत अनधिकृत मोबाईल टॉवर

धारावीमध्ये झोपडपट्टीत मोबाईल टॉवर बसवण्यात आले आहे. प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून माझ्याकडे तक्रार आल्यानंतर आपण ही बाब लक्षात आणून देऊनही त्या अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई होत नसल्याची खंत माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी व्यक्त केली. तर भाजपाचे पराग शहा यांनी या मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल,पण सध्या बेघर झालेल्या या कुटुंबांचे पुनर्वसन कुठे केले जाणार आहे,असा सवाल प्रशासनाला केला. नवीन नियमांमुळे इमारतींच्या पुनर्विकासात अडथळे येत आहेत. मग या कुटुंबांनी कुठे जावे, असाही सवाल त्यांनी केला.


किती लोकांचे जीव प्रशासन घेणार?

किती लोकांचे जीव घेऊन प्रशासन शांत होणार आहे, असा सवाल करत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी डॉकयार्ड इमारत दुघर्टनेत सहायक आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना वाचवण्यात आले. परंतु प्रशासनाने त्यांना वाचवले तर नियतीने त्याच्यावर सूड उगवलाच. त्यामुळे सहायक आयुक्तांबरोबरच अतिरिक्त आयुक्तांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी यशवंत जाधव यांनी केली. भाजपाच्या बिंदू त्रिवेदी यांनी शितप हा नेहमीच महापालिका माझ्या पाठीशी असल्याचा आरोप करत होत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत किशोरी पेडणेकर, मेहर हैदर आदींनी भाग घेतला होता. दरम्यान याप्रकरणी जे कोणी उच्चपदस्थ असतील मग ते कोणत्याही पक्षाचे असतील वा प्रशासनातील अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा