ढिगाऱ्याखालून परतलेल्या 'वर्षा'ची कहाणी!

 Ghatkopar
ढिगाऱ्याखालून परतलेल्या 'वर्षा'ची कहाणी!

माझा एक हात बाहेर आणि संपूर्ण शरीर ढिगाऱ्याखाली होतं. हलताही येत नव्हतं. फक्त हाताच्या खाली काहीतरी लागलं म्हणून नजर तिरपी केली आणि पाहिलं की एक आई आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला कुशीत घेऊन होती. तिला वाचवता आलं नाही कारण त्या दोघींनी जागीच प्राण सोडले होते. मला काही सुचतच नव्हतं. पण, सर्व शक्ती पणाला लावली आणि अंगावरचा ढिगारा बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला. रहिवाश्यांना हाका मारल्या आणि मला त्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं...

हा प्रत्यक्ष अनुभव आहे 20 वर्षीय ‘वर्षा सकपाळ’ हिचा...घाटकोपरमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली वर्षादेखील अडकली होती. पण, तिची जगण्याची इच्छाशक्ती प्रबळ होती, म्हणून ती एवढ्या मोठ्या घटनेतून परतली.

वर्षा सकपाळ हिने नुकतीच टीवायवीची परिक्षा दिली आहे. सोमय्या कॉलेजमधून शिकलेली वर्षा आपल्या निकालाची वाट पहात होती. पण, घरी बसून काय करणार? म्हणून ती एका कंपनीत अकाऊटंट म्हणून कामाला लागली. गेले 3 महिने ती या कंपनीत काम करत होती. ती कंपनी दुसऱ्या कोणाची नसून या सर्व घटनेला जबाबदार असणाऱ्या ‘सितप’ची होती.


नेमकं घडलं काय?

मंगळवारी नेहमीप्रमाणे वर्षा आपल्या कामावर गेली. काहीतरी घडतंय असं तिच्या मैत्रिणींना वाटलं. म्हणून त्या आधीच त्या इमारतीतून बाहेर पडल्या. पण, वर्षाला आधीही दोनदा असा आवाज आला होता. म्हणून तिने जास्त विचार केला नाही. नेहमीसारखीच आताही इमारत हलतेय, आवाज होतोय म्हणून तिने जास्त लक्ष दिलं नाही. पण, नंतर इमारतीच्या शिडीपर्यंत वर्षा पोहोचते ना पोहोचते तेवढ्यात संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. फक्त 3 ते 4 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. संपूर्ण इमारतीचा ढिगारा झाला.


मला तो प्रसंग आठवूनही भीती वाटते. जेव्हा मला कळलं की माझ्या अंगावर इमारतीचा ढिगारा आहे, मी माझा एक हात बाहेर काढला आणि ओरडून रहिवाश्यांना मला बाहेर काढायला सांगितलं. बाहेर काढल्यानंतर एका महिलेकडून मी मोबाईल घेतला आणि माझ्या वडिलांना फोन केला. माझे वडील ऑटो घेऊन आले आणि मला राजावाडीत दाखल केलं. आता माझी प्रकृती ठीक आहे.

वर्षा सकपाळ, विद्यार्थी, सोमय्या कॉलेज


5 ते 6 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं...

25 जुलै 2017 च्या सकाळी 10 वाजता घाटकोपरची साईसिद्धी इमारत कोसळली. त्या ढिगाऱ्याखाली 17 जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण जखमी झाले. जखमी झालेल्यांवर घाटकोपरच्या शांतिनिकेतन आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


तिला आजच डिस्चार्ज देण्यात येणार होता. पण, आम्हीच तिची गैरसोय होऊ नये म्हणून 'आणखी दोन दिवस रुग्णालयात ठेऊन घ्या' असा आग्रह डॉक्टरांकडे केला. आता ती ठीक आहे. फक्त डोक्याला जबर मार बसलाय. आणि 5 टाके बसलेत.

अनिता सकपाळ, वर्षाची आई

वर्षा सकपाळ हिच्या डोक्यावर जबर मार बसलाय. त्यामुळे तिच्या डोक्यावर 5 टाकेही घालण्यात आले आहेत. हातापायालाही जखम झाली आहे. पण, आता तिची प्रकृती स्थिर आहे. लवकरच तिला डिस्चार्ज  देण्यात येणार आहे.हेही वाचा

घाटकोपरमध्ये 4 मजली इमारत कोसळली, 17 ठार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments