Advertisement

५७६ संडासकऱ्यांवर गुड मॉर्निंग पथकाची कारवाई


५७६ संडासकऱ्यांवर गुड मॉर्निंग पथकाची कारवाई
SHARES

महापालिकेच्या माध्यमातून शौचालये उपलब्ध करून दिल्यानंतर, तसेच लोकांमध्ये प्रबोधन केल्यानंतरही उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून अशा उघडयावर शौचास बसणाऱ्या संडासकऱ्यांना पकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मागील १५ दिवसांमध्येच तब्बल ५७६ संडासकऱ्यांना गुड मॉर्निंग करत महापालिकेच्या पथकाने त्यांच्याकडून ५७ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल केला आहे!


८ हजार शौचालयांची उभारणी

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातील निकषांनुसार डिसेंबर २०१६ व जुलै २०१७ मध्ये मुंबई महापालिकेला हगणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३६ 'गुड मॉर्निंग' पथकांची स्थापना करण्यात आली असून, हे पथक पहाटे ५.३० पासून हागणदारी मुक्तीसाठी काम करत असते. नागरिकांना त्यांच्या निवासी परिसराच्या ५०० मीटरच्या क्षेत्रात सर्वत्र शौचालये उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यानुसार मुंबईत सुमारे ८० हजार आसनांची ८ हजार ४१५ शौचालये बांधली गेली असून जानेवारी २०१७ पासून ४ हजार २५७ आसनांची नवीन शौचालये बांधण्यात आलेली आहेत.

  

१५ दिवसांमध्ये धडक कारवाई

वारंवार विनंती करुनही शौचालयाचा वापर न करणा-या व्यक्तींवर 'गुड मॉर्निंग' पथकाद्वारे दंड आकारणी करण्यात येत आहे. या प्रत्येक पथकात ५ कर्मचा-यांचा समावेश आहे. यामध्ये कनिष्ठ आवेक्षक, मुकादम, क्लीन-अप मार्शल, कामगार इत्यादी मनपा कर्मचारी आहेत. यानुसार ३६ पथकांमध्ये एकूण १८० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या सुमारे १५ दिवसांत ‘गुड मॉर्निंग’ पथकांद्वारे ५७६ व्यक्तिंकडून ५७ हजार ६०० रुपये इतका दंड  वसूल करण्यात आला आहे.


३६ गुडमॉर्निंग पथकांची कारवाई

महापालिकेची ‘गुड मॉर्निंग’ पथके दररोज पहाटे ५.३० पासून आपल्या कामाला सुरुवात करत असून, ज्या भागात उघड्यावरील हागणदारी आढळून येऊ शकते, त्या परिसरातील नागरिकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी विनंती करत असतात. या ३६ पथकांपैकी ३३ पथके ही विभाग स्तरावर कार्यरत आहेत. तर उर्वरित ३ पथके ही शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांमध्ये कार्यरत असल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. या सर्व कामांचा दैनंदिन आढावा अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडून घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



हेही वाचा

ट्रेनच्या प्रत्येक बोगीतलं एक शौचालय हटवणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा