मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारनं अखेर मान्यता दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हुतात्मा चौकाच्या धर्तीवर या भीमज्योतची उभारणी केली जाणार आहे. तसंच, येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ज्योतचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत मंगळवारी मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापालिका अधिकारी, आंबेडकरी संघटना, चैत्यभूमी समन्वय समितीचे सदस्य, आमदार कालिदास कोळंबकर आणि भाई गिरकर यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भीमज्योतला मान्यता देण्यात आली आहे. हुतात्मा चौकातील ज्योतीप्रमाणे चैत्यभूमीवरील भीमज्योतही अखंडपणे तेवत राहणार आहे.
चैत्यभूमीला दररोज अनेक लोक भेट देत असतात. तसंच, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि ६ डिसेंबर रोजी पुण्यतिथीनिमित्त राज्यासह देशभरातून बाबासाहेबांचे अनेक अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.
हेही वाचा -
'वायू' वादळाचं संकट टळलं, मात्र मुंबईत त्याचे जाणवणार परिणाम
गोरेगाव फिल्म सिटी बनणार जागतिक दर्जाची