जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभे करण्यासाठी वरळी दुग्धशाळेच्या १२ एकर भूखंडावरील आरक्षण बदलाच्या नस्तीला मुख्यमंत्र्यांनी अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे मत्स्यालय उभारण्यात येत आहे.
अहवालानुसार, सूत्रांनी सविस्तर सांगितलं की, येत्या काही दिवसांत, एमआरटीपी कायदा 37 (1) अंतर्गत राज्य सरकार शिफारसी आणि हरकती मागवून एक सार्वजनिक अधिसूचना काढेल.
वरळी दुग्धशाळेच्या भूखंडापैकी काही भाग झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आणि १२ एकर भूखंड जागतिक दर्जाच्या मत्स्यालय, पर्यटन संकुल, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासाठी वापरला जाणार आहे. उर्वरित साडेतीन एकर भूखंड दुग्ध विभागाला कार्यालये, सेवा निवासस्थाने आदींसाठी उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
यासाठी तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे की, दुग्धव्यवसाय कमी झाल्यामुळे जमिनीचा योग्य वापर होत नसल्याचं सरकारचं मत आहे. अधिकाऱ्यानं पुढे सांगितलं की, राज्य पशुसंवर्धन विभागानं कारवाईला विरोध केला असताना, ठाकरे त्यांना समजावण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे हे क्षेत्र आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येते.
देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीनं मुंबईमध्ये बँकॉक इथलं सिअॅम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असं मल्टीलेव्हल अॅक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. याच ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे. आता जागतिक दर्जाचे मत्स्यालयही वरळीतच उभे राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा