Advertisement

मुंबईतील दिव्यांग राहिलेत तीनचाकी स्कूटरपासून वंचित


मुंबईतील दिव्यांग राहिलेत तीनचाकी स्कूटरपासून वंचित
SHARES

मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना आता तीनचाकी स्कूटर उपलब्ध करून देण्यासाठी ५६ हजारांपर्यंतचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मागील १० महिन्यांपासून दिव्यांग या स्कूटरच्या लाभापासून वंचित आहेत. महापालिका सभागृहात यावर वेळीच निर्णय घेण्यात न आल्यामुळे दिव्यांगांच्या स्कूटर वाटपालाच ब्रेक लागला असून आता ही रक्कम वाढवून ७० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या दिव्यांगांना याचा लाभ कधी मिळणार की केवळ त्यांना गाजरच दाखवली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


८५ टक्के रकमेचा निर्णय

महापालिकेने मुंबईतील तब्बल १०७१ व्यक्तींना तीनचाकी स्कूटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी दिव्यांगांना ही स्कूटर प्रथम खरेदी करावी लागणार होती. त्यानंतर याच्या खरेदीवर ७५ टक्के रक्कम अर्थात ५६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य या दिव्यागांला देण्यात येणार होतं. याबाबतचा प्रस्ताव नोव्हेंबर २०१७ ला स्थायी समितीपुढे मांडला असता, त्यात उपसूचनेदवारे सुधारणा करून दिव्यांगांना ८५ टक्के एवढी रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला.


सुधारीत प्रस्ताव

नोव्हेंबर हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्यानंतर सभागृहापुढे तो प्रस्ताव १० एप्रिलला सादर झाला. परंतु आर्थिक वर्ष संपल्यानं सभागृहाने या प्रस्तावाला मंजुरी न देता तो फेटाळून लावला. त्यामुळे प्रत्यक्षात दिव्यांगांना याचा लाभ देता आला असून आता प्रशासनानं सुधारीत प्रस्ताव बनवला आहे.


कुठली स्कूटर ?

होंडा अॅक्टिव्हा स्कूटर ही साईड व्हील लावून ८१ हजार ९४५ रुपयांना जीएसटीसह दिली मिळणार आहे. त्यामुळे या रकमेच्या ८५ टक्के एवढी अर्थात ७० हजार एवढी रक्कम दिव्यांगांना स्कूटर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दिली जाणार आहे. या योजनेत लाभार्थीला कोणत्याही ब्रँडची स्कूटरची खरेदी करता येईल व त्यास कोणत्याही सर्विस सेंटरकडून साईड व्हील्स बसवून घेण्याची मुभा राहील. अर्थात वाहन आणि साईड व्हील्सची असेंब्ली ही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केलेल्या मानकांप्रमाणे असणं आवश्यक असल्याचं नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.


अर्जाची छाननी

दिव्यांगांना आधी ही स्कूटर खरेदी करावी लागणार आहे. सर्व दिव्यांगांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थी अर्जदाराचे खरेदी करण्यात येणाऱ्या स्कूटरचं अर्थपूर्ण चलन तसंच साईड व्हिल्स लावण्याचं अर्थपूर्ण चलन हे सहायक आयुक्त (नियोजन) यांच्या कार्यालयामार्फत समाजविकास अधिकाऱ्यांना पाठवलं जाईल. स्कूटरची खरेदी केल्यानंतर यासाठीचं ४७ हजाराचं अर्थसहाय्य दिलं जाईल आणि त्यानंतर स्कूटरला साईड व्हिल्स लावल्यानंतर उर्वरीत २३ हजाराची रक्कम प्रिपेड कार्डद्वारे दिली जाणार असल्याची माहिती महापालिका नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.


'अशी' ठरणार पात्रता

  • लाभार्थी हा मुंबई महापालिका क्षेत्रात राहणारा असावा
  • ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचं प्रमाणपत्र
  • १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती लाभास पात्र
  • दुचाकी चालविण्याचा परवाना
  • कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावं
  • शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम तसंच खासगी कंपनीत कायम नोकरीवर नसावे

हेही वाचा-

मुंबईतील दिव्यांगाना मिळणार तीन चाकी स्कूटर

गूड न्यूज! दिव्यांगांना स्कूटरसाठी मिळणार ८५ टक्के रक्कम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा