Advertisement

मुंबईत अवघे १५ वाहनतळ, लाखो वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम

मुंबईत जास्त पार्किंग उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने बिल्डरांना अतिरिक्त चार एफएसआय देऊन ९३ वाहनतळे बांधण्याचे कंत्राट दिले. या ९३ वाहनतळांमध्ये ५५ हजार ७४२ गाड्या पार्क होणार आहेत.

मुंबईत अवघे १५ वाहनतळ, लाखो वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस अवैध पार्किंगचं प्रमाण वाढत आहे. या अवैध पार्किंगचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसं अवैध पार्किंगमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडीही होत आहे. मुंबईत वाहनतळांची अपुरी असलेली संख्या हे अवैध पार्किंग वाढण्याचं कारण आहे. वाहनतळावर जागा नसल्याने वाहनचालकांना रस्त्यावरच वाहनं लावावी लागत आहेत. त्यामुळे वाहनतळांची संख्या वाढवणे हाच अवैध पार्किंगवर उपाय आहे. 

मुंबईत एकूण ३३ ते ३५ लाख दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या वाहनांसाठी फक्त १५ वाहनतळ आहेत. या वाहनतळांमध्ये अवघी ९ हजार वाहनेच पार्क होतात. त्यामुळे इतर लाखो वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर अवैध पार्किंग वाढलं आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. अवैध पार्किंग आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहनकोंडी याला नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. 

मुंबईत जास्त पार्किंग उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने बिल्डरांना अतिरिक्त चार एफएसआय देऊन ९३ वाहनतळे बांधण्याचे कंत्राट दिले. या ९३ वाहनतळांमध्ये ५५ हजार ७४२ गाड्या पार्क होणार आहेत. मात्र, आतापर्यंत यामधील फक्त २६ वाहनतळे पालिकेच्या ताब्यात आली आहेत. यामध्ये २१,७७८ गाड्या पार्क होतील. पण या २६ पैकी १५ वाहनतळेच सुरू झाली आहेत. या १५ वाहनतळांमध्ये ९ हजार गाड्या पार्क होत आहे. त्यामुळे मुंबईतील उरलेल्या लाखो वाहनांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. 

 मुंबईत महापालिकेच्या वाहनतळापासून ५०० मीटरच्या अंतरावर अवैध पार्किंग केल्यास दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येतो. वाहनतळ कमी असल्याने मुंबईकरांनी दंडात्मक कारवाईला विरोध केला. हा वाद न्यायालयातही गेला. मात्र, न्यायालयाने पालिकेच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे मुंबईकर हतबल झाले आहेत. त्यांना कारवाईला तोंड द्यावं लागतं आहे. पालिकेने पार्किंगसाठी वाहनतळ उपलबध करून द्यावेत असं मुंबईकरांचं म्हणणं आहे. 



हेही वाचा -

बीकेसी, माझगावची हवा सर्वाधिक दूषित

मुंबई बंदरात ४ आलिशान क्रुझचं आगमन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा