मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांसाठी पॉड हॉटेल

प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत प्रवाशांना सुख-सोयींनी सुसज्ज अशी छोट्या आकारातील पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय आयआरसीटीसीनं घेतला आहे.

SHARE

एखादी ट्रेन पकडण्यास उशीर झाला त्यावेळी प्रवाशांना दुसरी ट्रेन पकडण्यासाठी काही तास प्रतिक्षा करावी लागते. अशावेळी महागड्या हॉटेलमध्ये राहणं सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यावेळी ते रेल्वे स्थानक अथवा टर्मिनसवरच रात्र काढतात. त्यामुळं प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गैरसोय लक्षात घेत प्रवाशांना सुख-सोयींनी सुसज्ज अशी छोट्या आकारातील पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय 'इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम'नं (आयआरसीटीसी) घेतला आहे.

आरामदायी सुविधा

मार्च २०२०पर्यंत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील पॉड प्रवाशांसाठी खुलं करण्याचं नियोजन आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि आरामदायी सुविधा देण्यासाठी पॉड हॉटेल सुरू करण्यात येत आहेत. रेल्वे स्थानकांलगत आधुनिक सोयी-सुविधांयुक्त राहण्याची व्यवस्था नसल्यानं प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी हॉटेलमध्ये जावं लागतं.

निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

मुंबई सेंट्रल येथील पॉड हॉटेलसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणासाठी बुधवार १८ डिसेंबरला निविदा उघडण्यात येणार आहे. ठेकेदार नियुक्त केल्यानंतर साधारणपणे २ ते ३ महिन्यांचा कालावधी पॉड हॉटेलच्या उभारणीसाठी देण्यात येणार आहे. मार्चपर्यंत मुंबई सेंट्रल इथं २५ खोल्यांचं पॉड हॉटेल उभारण्याचं नियोजन आहे. हॉटेल सुरू झाल्यानंतर १२ तासांसाठी प्रवाशांना या खोल्या भाड्यानं देण्यात येणार असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे.

जागेची मर्यादा

रेल्वे स्थानक परिसरात जागेची मर्यादा लक्षात घेता, एका व्यक्तीला आरामात राहता येईल, अशा पद्धतीने खोल्या बांधण्यात येतील. खोल्यांच्या कॅप्सूलसारख्या आकारामुळेच याला पॉड किंवा कॅप्सूल हॉटेल असे ही बोलले जाते. या खोल्या संपूर्णपणे वातानुकूलित असणार आहेत. हॉटेलमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात येतील. त्याचबरोबर हॉटेल परिसरात स्वच्छता गृह, कॉफीशॉप अशा अन्य सुविधादेखील पुरवण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

आम्ही मुंबईवर लक्ष केंद्रीत केलंय, पुढील महापौर भाजपचा- चंद्रकांत पाटील

'ह्या' मार्गाने पीपीएफमध्ये करा ऑनलाइन पैसे जमा



संबंधित विषय
ताज्या बातम्या