Advertisement

पेट्रोल महागलं तर डिझेल स्वस्त

रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर शनिवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेलमध्ये २६ पैशांची वाढ झाली होती.

पेट्रोल महागलं तर डिझेल स्वस्त
SHARES

मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने इंधनांच्या दरात वाढ होत आहे. सोमवारीही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल २८ पैशांनी महाग केलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे तब्बल तीन महिन्यांनंतर डिझेल स्वस्त झालं आहे. डिझेलच्या दरात १६ पैशांची कपात करण्यात आली आहे. 

रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर शनिवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेलमध्ये २६ पैशांची वाढ झाली होती. तीन महिन्यांनंतर डिझेलमध्ये दर कपात करण्यात आली असली तर पेट्रोलमधील दरवाढ कायम आहे. या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२० रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.१९. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.९२ रुपये इतका झाला आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.३५ रुपये झाले आहे.

दर कपातीने मुंबईत डिझेलचा भाव ९७.२९ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.७२ रुपये झाले आहे. चेन्नईत ९४.२४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.८१ रुपये प्रती लीटर झाला आहे. 

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. 

मार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. 

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. तर महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. तसंच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.



हेही वाचा -

मुंबईतील 'या' भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबानं होणार

तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा