Advertisement

‘तेव्हाच’ माझा विकासकामांना विरोध, मुख्यमंत्र्यांनी केली भूमिका स्पष्ट

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विकासकामांसदर्भातील आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली आहे.

‘तेव्हाच’ माझा विकासकामांना विरोध, मुख्यमंत्र्यांनी केली भूमिका स्पष्ट
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विकासकामांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप अधूनमधून विरोधकांकडून करण्यात येत असतो. खासकरून फडणवीस सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेली विकासकामे प्राधान्यक्रमानुसार हाती घेण्यात येतील, या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर भाजपने जोरदार टीका केली होती. मात्र आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विकासकामांसदर्भातील आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितलं की, आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललो आहेत. त्यामुळेच जंगलाचा ऱ्हास करून विकासकामांचे प्रस्ताव जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे असं नाही. तर निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य आहे, असं ते म्हणाले. 

हवामान बदलाचं कारण

मानवी वस्तीवर वन्यजीवांनी कधी अतिक्रमण केल्याचं पाहिले आहे का?, त्यांनी एखादी बिल्डिंग रिकामी करून, पाडून तिथं राहण्यास सुरुवात केली असं ऐकलं आहे का? नाही, पण माणूस मात्र वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करत असल्याचं दिसतं. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आलं, यावर्षी तौंते चक्रीवादळ आलं. चक्रीवादळ आलं की आपण हवामान बदलाचं कारण सांगतो. पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- हिंदमाता परिसरातील भूमिगत टाक्यांचं काम कुठपर्यंत?

लोकसहभागाची गरज

विकासकामे करताना ती निसर्गाची जपणूक करून कशी केली जावीत हे सांगणारी आणि यासाठीचा तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी, जिचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे, अशी संस्था महाराष्ट्रात स्थापन करावी. जैवविविधतेत नष्ट होणाऱ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची नोंद घेणं एवढंच काम या क्षेत्रात होऊ नये, तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. लोकसहभाग वाढवून त्याच्या रक्षणाचं काम व्हावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

नवोदित संशोधकांना प्रोत्साहन  

आजच्या युवा पिढीमध्ये निसर्ग, जैवविविधता याविषयी प्रचंड रस आहे. ते या क्षेत्रात अभ्यास करून, संशोधन करून पुढे जाऊ इच्छितात. अशा सर्व युवकांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आरे वाचवलं

आरेचं जंगल आपण वाचवलं. शहरात जंगल आणि या जंगलामध्ये प्रचंड जैवविविधता असलेले आरेचे क्षेत्र आपण जपलं. जगात अशा प्रकारे शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर, असेल असंही ते म्हणाले.

लक्ष्मणरेषा ओलांडू नये

निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पाहतो आणि आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होते हे कोरोना विषाणूने दाखवून दिलं आहे.निसर्गासोबत जगण्यासाठी सुयोग्य वर्तन विकसित करायला हवं, असं झाले तरच “आरोग्यदायी विकास” होईल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा