राज्य सरकारने पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दिवाळीची सुट्टी (diwali vacation) जाहीर केली आहे. या दरम्यान शाळांचे आॅनलाईन वर्ग पूर्णपणे बंद राहतील. यासंदर्भातील परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने गुरूवारी प्रसिद्ध केलं आहे. परंतु केवळ ५ दिवस मिळणाऱ्या या सुट्टीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये थोडीफार नाराजी आहे.
त्याआधी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लाॅकडाऊनमुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्ष शाळा सुरू न करता २२ जुलैपासून पूर्वप्राथमिक ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रौत्सव अशा सणांमध्येही विद्यार्थ्यांना आॅनलाईन अभ्यास करावा लागला. महाराष्ट्रात गणेशोत्सवात मोठी सुट्टी असते, ती देखील यंदा विद्यार्थ्यांना मिळाली नाही.
शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सणाची शाळा सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा- ऑनलाईन शिक्षणातूनही मिळणार दिवाळीची सुट्टी
माध्यमिक शिक्षण संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षांतील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, तसंच कामाचे एकू ण दिवस २३० होणं आवश्यक आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे एकूण दिवस २०० व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकणिाऱ्या शिक्षकांच्या कामाचे दिवस २२० होणं आवश्यक आहे.
शाळांना आधी २१ दिवस दिवाळीची सुट्टी देण्यात येत होती. त्यांनतर वार्षिक सुट्ट्या ८० ऐवजी ७६ करण्यात आल्याने शाळांची दिवाळी सुट्टी १८ दिवस करण्यात आली. मात्र यावर्षी सुट्टी कापून ती थेट ५ दिवस इतकी कमी करण्यात आली आहे. या तुलनेत केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहतील, असे निर्देश दिले आहेत. तर गुजरातमधील शाळांना २० दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत आॅनलाईनच्या माध्यमातून मुलं दररोज शिक्षण घेत असताना दिवाळीच्या काळात तरी त्यांना सणाचा आनंद घेण्यासोबत थोडाफार मानसिक आराम मिळावा म्हणून नियमानुसार १८ दिवस सुट्टी देण्याची मागणी होत आहे.
(maharashtra government education department declared 5 day diwali vacation for students and teachers)