
महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी योग्य जागा निश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचा प्रस्ताव तातडीने महसूल विभागाकडे पाठवण्यासही त्यांनी सांगितले आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत वसई येथे प्रस्तावित प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला आमदार स्नेहा दुबे आणि मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार उपस्थित होत्या. या केंद्रामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असे सांगत राणे यांनी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला.
तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जास्तीत जास्त लाभ मच्छीमारांपर्यंत पोहोचावा यासाठी जनजागृती शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील मच्छीमारांच्या विविध मागण्यांबाबतही स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीला पर्यटन विभागाचे सचिव संजय खांदारे उपस्थित होते.
या बैठकीत मासे वाळवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, जाळी आणि बोटी दुरुस्ती केंद्र उभारणे, मच्छीमार गावे विकसित करणे तसेच पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प राबवणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
‘बँक वॉटर’ प्रकल्पांतर्गत आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या सर्व कामांना गती देण्यासाठी संबंधित सर्व घटकांची बैठक घेण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
याशिवाय, मच्छीमार सहकारी संस्थांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेबाबत माहिती देण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्यावरही राणे यांनी विशेष भर दिला.
हेही वाचा
