Advertisement

एकविरा देवी मंदिर, राजगड किल्ल्यावर ‘रोप वे’ नं जाता येणार

हे दोन्ही रोप-वे प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर बांधण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन विभागासाठी हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे.

SHARES

पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी मंदिर (Ekvira Temple) आणि राजगड किल्ल्यावर (Rajgad Fort) आता लवकरच रोप-वे (ropeway) ने जाता येणार आहे. रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग (maharashtra tourism department) आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांनी नुकताच सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता काही मिनिटांमध्ये येथे जाता येणार आहे.

हे दोन्ही रोप-वे प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर बांधण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन विभागासाठी हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत याबाबतच्या करारावर सह्या करण्यात आल्या. रोप वे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करणे, निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबविणे यासाठी हा करार करण्यात आला. राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) यांच्यासमवेतही सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, भारतीय पोर्ट रेल व रोप वे महामंडळाचे संचालक अनिलकुमार गुप्ता, सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे उपस्थित होते.

एकविरा मंदिर आणि राजगड किल्ला ही दोन्ही ठिकाणे राज्याची भक्ती आणि शक्तिपीठे आहेत.रोप-वेमुळे भाविक आणि पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांवर पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. यातून पर्यटनाला चालना मिळेल. येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एकविरा देवी मंदिर लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी असलेल्या कार्ला लेणी पर्यटकांचे आकर्षण आहेत. मंदिरात वर्षभरात सात ते आठ लाख भाविक भेट देतात. राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची सुमारे २५ वर्षे राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ट्रेकिंगसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.



हेही वाचा -

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय

सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा