Advertisement

ठाणे स्थानकात उलटं चाललं एस्कलेटर, ५ प्रवासी जखमी


ठाणे स्थानकात उलटं चाललं एस्कलेटर, ५ प्रवासी जखमी
SHARES

ठाणे रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्यात तांत्रिक बिघाड होऊन तो मध्येच बंद झाल्याने ५ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, स्वयंचलित सरकता जिना उलट्या दिशेने चालू लागला. पण, त्याच जिन्यावर असलेल्या एका व्यक्तीने इमर्जन्सी बटण दाबून मोठी दुर्घटना होण्यापासून सगळ्यांना वाचवलं. रेल्वेकडून मात्र या दाव्याचं खंडन करत सरकता जिना उलट्या दिशेने चालूच नव्हता, असं सांगण्यात आलं आहे.


प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे टळली दुर्घटना

ठाणे रेल्वे स्थानकात ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्म नंबर १ येथे घडली. एका प्रत्यक्षदर्शीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, 'स्वयंचलित जिना कदाचित ओव्हरलोडेड होता. त्यामुळे तो मध्येच बंद झाला. त्यातच काही लोकांचा तोल जाऊ लागला. कुणाला काही समजण्याआधीच जिना उलट्या दिशेने चालू लागला. जिन्यावर उभे असलेल्या सर्व प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. आरडाओरडा सुरू झाला. त्याचवेळी एका प्रवाशाने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी बटण दाबले आणि एस्कलेटर स्विच ऑफ केलं. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित जिना बंद केला.'


स्थानिक रुग्णालयात जखमी दाखल

या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. पाच जखमींमधून एका व्यक्तीला फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं जात आहे. ठाणे स्टेशन व्यवस्थापक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जखमींना जवळच्या मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले आहे. सुजीत ठाकूर (३१), तेजस्विनी मिश्रा (२३) आणि कुलदीप वारे (२५) अशी ३ जखमींची नावे आहेत.


१५ दिवसांपासून जिने बंदच

प्रवाशांनी या घटनेला रेल्वे प्रशासनाला जबाबदार ठरवलं आहे. शिवाय, एखादी मोठी दुर्घटना होण्याची रेल्वे प्रशासन वाट बघतंय का? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. ठाणे स्थानकांत ८ स्वयंचलित जिने आहेत. शिवाय, ठाणे रेल्वे स्थानकात आज जितके सरकते जिने आहेत, त्यातले बहुतांश जिने गेल्या १५ दिवसांपासून बंदच असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे.


रेल्वेने सुरू केली चौकशी

मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एस्कलेटर खाली जाण्याची शक्यता आहे. हँड रेल स्लीपेजमुळे तात्काळ ब्रेक लागू करण्यात आला. तांत्रिक बिघाड, अडथळ्यामुळे, एस्कलेटरवरील लोकांना अचानक धक्का बसला आणि दोन जण खाली पडले. एस्कलेटर कोणत्या कारणामुळे उलट्या दिशेने चालू लागला याचं कारण शोधण्याचं काम सुरू आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा