Advertisement

मन की बात करणारे धन की बात करताहेत: महापौरांचा भाजपाला टोला

शिवसेना आपली जबाबदारी ओळखून काम करते. कुणाला स्वप्न दाखवत नाही, असं सांगत मन की बात करणारे आता धन की बात करू लागले आहेत, असा अप्रत्यक्ष टोला पत्रकारांशी संवाद साधताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मारला.

मन की बात करणारे धन की बात करताहेत: महापौरांचा भाजपाला टोला
SHARES

शिवसेनेवर कोणत्याही प्रकारची टीका न करण्याची भूमिका भाजपाने घेतलेली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आता महापौरांनीही भाजपावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आपली जबाबदारी ओळखून काम करते. कुणाला स्वप्न दाखवत नाही, असं सांगत मन की बात करणारे आता धन की बात करू लागले आहेत, असा अप्रत्यक्ष टोला पत्रकारांशी संवाद साधताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मारला.


शिवसेनेकडून शाब्दीक हल्ला

शिवसेनेकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात असल्यानं दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. २ तास बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर शहा यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेनेवर टीका न करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

मात्र, शिवसेनेकडून भाजपावर शाब्दीक हल्ला चढवला जात आहे. भाजपासोबत शिवसेनाही राज्यातील सत्तेत सहभागी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महापालिकेच्या कामकाजात आणि कारभारात ढवळाढवळ केली जात असल्याने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.


तर, आढावा बैठक घ्या

मुख्यमंत्र्यांवर महापौरांनी केलेल्या टीकेला भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस हे जबाबदार मुख्यमंत्री आहेत. जनतेला सुविधा मिळण्यासाठी तसंच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ते आढावा बैठक घेत असतात. परंतु महापौरांना अशाप्रकारची आढावा बैठक घ्यायला कुणी अडवलंय, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री हे ढवळाढवळ करत नाही तर जबाबदारी समजून काम करत असल्याचं कोटक यांनी सांगितलं.


मागं हटायचं नाही

मात्र, कोटक यांच्या प्रतिक्रियेचा समाचार घेत महापौरांनी थेट भाजपावर हल्ला चढवला. आम्हाला आमची जबाबदारी समजते. आम्ही कुणाला स्वप्न दाखवून फसवलं नाही. मन की बात करणारेच आता धन की बात करू लागले आहेत. जबाबदारी झटकून मागं हटायचं नाही, तर त्याला सामोरं जायचं हे आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याच जबाबदारीच्या जाणीवेतूनच काम करत असल्याचं सांगितलं.



हेही वाचा-

रेल्वे रुळांवर का तुंबतं पाणी? वाचा...

गोदरेजने लक्ष्मीबाग नाल्याची भिंत फोडली



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा