जेवणावळीवर पाच महिन्यात 20 लाखांचा खर्च

 Pali Hill
जेवणावळीवर पाच महिन्यात 20 लाखांचा खर्च

मुंबई - देवनार डंपिंग ग्राऊंडवरील आग विझवण्यासाठी तब्बल पाच महिने तळ ठोकून असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या जेवणावर तब्बल २० लाख ४४ हजार ३२० रूपये खर्च केल्याची धक्कादायक बाब उजेडात आलीय. कोणतेही टेंडर न मागवताच हा खर्च करण्यात आल्यानं हा प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आलाय. त्यामुळे हा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

२८ जानेवारी आणि त्यानंतर २० मार्च रोजी देवनार डंपिंग ग्राऊंडवर मोठी आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निमशन दलाकडून अविरतपणे काम सुरू होते. मात्र त्यानंतरही आगी लागण्याचे प्रकार सातत्याने सुरू होते. त्यामुळे अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान प्रतिकूल परिस्थितीत २४ तास काम करीत होते. आगीचे गंभीर स्वरूप पाहता त्यांना जेवायला जाणे शक्य नसल्यामुळे त्यांना तातडीने २ वेळच्या जेवणाची नाश्त्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था डंपिंग ग्राऊंडवर करण्यात आली. त्यामुळे 31 जानेवारीपासून ते 12 जूलै या कालावधीत अग्निशमन दलाच्या जवानांसाठी नाश्ता,जेवण आणि पिण्यासाठी पाणी यावर सुमारे 20 लाख 44 हजार रूपये खर्च झालाय. ही व्यवस्था तातडीने करावयाची असल्यानं कोणतीही निविदा न मागवताच में सिपंली डिलिशियस यांच्याकडून ही व्यवस्था करण्यात आलीय. मात्र अग्निशमन दलाचे किती अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते याविषयीची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Loading Comments