मुंबई लाइव्हचा दणका! हडपलेली १४ घरं पुन्हा मोतीलाल नगरच्या लेआऊटमध्ये

मोतीलाल नगरला लागूनच पत्राचाळ असून या पत्राचाळीचा पुनर्विकास ज्या बिल्डरकडून सुरू होता त्या बिल्डरने ही जागा हडपण्यासाठी मोतीलाल नगरच्या मूळ आराखड्यातील १४ घरे पत्राचाळीच्या आराखड्यात समाविष्ट करून घेतली. बिल्डरने जेव्हा या १४ रहिवाशांना घरं खाली करण्यास सांगितलं तेव्हा या रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली त्यातून हा घोटाळा उघड झाला.

SHARE

गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाच्या नावाखाली म्हाडाला १००० कोटींहून अधिक रुपयांना चुना लावणाऱ्या बिल्डरच्या आणखी एका घोटाळ्याचा पर्दाफाश 'मुंबई लाइव्ह'नं वर्षभरापूर्वी केला होता. तो घोटाळा होता मोतीलाल नगरमधील १४ घरं हडपण्याचा. या घोटाळा उघड झाल्यानंतर म्हाडामध्ये चांगलीच खळबळ उडाली नि म्हाडाच्या मुंबई मंडळाने ही घरं पुन्हा मोतीलाल नगरच्या लेआऊट (आराखडा) मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. अखेर वर्षभरानंतर मुंबई मंडळाने ही घरं मोतीलाल नगरमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करत नवीन आराखडा मुंबई महापालिकेच्या मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती मोतीलाल नगर विकास समितीने दिली.
'असा' झाला घोटाळा उघड

मोतीलाल नगरला लागूनच पत्राचाळ असून या पत्राचाळीचा पुनर्विकास ज्या बिल्डरकडून सुरू होता त्या बिल्डरने ही जागा हडपण्यासाठी मोतीलाल नगरच्या मूळ आराखड्यातील १४ घरे पत्राचाळीच्या आराखड्यात समाविष्ट करून घेतली. बिल्डरने जेव्हा या १४ रहिवाशांना घरं खाली करण्यास सांगितलं तेव्हा या रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली त्यातून हा घोटाळा उघड झाला.


आम्ही मोतीलाल नगरचेच

आपण मोतीलाल नगरचे रहिवासी असल्याचं ठामपणे सांगत रहिवाशांनी घरं खाली करण्यास नकार दिला. तेव्हा बिल्डरकडून रहिवाशांवर दबाव आणण्यात आला. दरम्यान मोतीलाल नगर विकास समितीने हा विषय उचलून धरत 'मुंबई लाइव्ह'कडे धाव घेतली. 'मुंबई लाइव्ह'ने डिसेंबर २०१६ मध्ये या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. बिल्डर, आर्किटेक्ट आणि म्हाडा अधिकारी कसे संगनमताने आपल्याला हवं ते करत आहेत हेच या घोटाळ्यातून समोर आलं.


पाठपुराव्याला यश

'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तानंतर म्हाडात चांगलीच खळबळ उडाली. तर मोतीलाल नगरमधील रहिवासी देखील म्हाडावर धडकले. 'मुंबई लाइव्ह'कडून देखील ही घरं पुन्हा मोतीलाल नगरच्या आराखड्यात समाविष्ट करण्यासंबंधी पाठपुरावा सुरू होता. अखेर या पाठपुराव्याला यश आलं असून ती १४ घरं पत्राचाळीच्या आराखड्यातून पुन्हा मोतीलाल नगरच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत.


रहिवाशांना न्याय

बुधवारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे म्हाडा अधिकारी आणि मोतीलाल नगर विकास समितीची बैठक झाली. या बैठकीत मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी नव्या आराखड्यात १४ घरे समाविष्ट करण्यात आली असून हा आराखडा महापालिकेसाठी मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती दिली. हडपलेली घरं पुन्हा मोतीलाल नगरच्या आराखड्यात आल्यानं रहिवाशांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया मोतीलाल नगर विकास समितीचे निलेश प्रभू यांनी दिली.हेही वाचा-

खोटारडेपणा भोवला! मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पत्राचाळीचा चुकीचा अहवाल देणारा अधिकारी निलंबित

पत्राचाळ सोसायटीला दणका, सोसायटी बरखास्त, प्रशासकाची नेमणूकसंबंधित विषय
ताज्या बातम्या