Advertisement

यंदाही म्हाडा लाॅटरीचा मुहूर्त चुकणार?

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घरांच्या किंमती निश्चित करत जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येणं अपेक्षित होतं. पण म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून घरांच्या आकड्यांची आणि घरांच्या किंमती निश्चित होणं बाकी आहे.

यंदाही म्हाडा लाॅटरीचा मुहूर्त चुकणार?
SHARES

नोव्हेंबर २०१७ मध्ये ८०३ घरांसाठी लाॅटरी काढताना म्हाडा मुंबई मंडळाकडून ३१ मे २०१८ मध्ये १००० घरांसाठी सोडत काढण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह म्हाडाने केली होती. या घोषणेनुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घरांच्या किंमती निश्चित करत जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येणं अपेक्षित होतं. पण म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून घरांच्या आकड्यांची आणि घरांच्या किंमती निश्चित होणं बाकी आहे. त्यामुळे यंदाही, गेल्या वर्षीप्रमाणे लाॅटरीचा मे महिन्याचा मुहूर्त चुकण्याची शक्यता आहे.


आकडा कसाबसा गाठला

अंदाजे २००७ पासून म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी सलग लाॅटरी काढली जात आहे. दोन अपवाद वगळले, तर घरांच्या लाॅटरीची जाहिरात ३१ मे रोजीच निघते. त्यामुळे ३१ मेच्या लाॅटरीकडे इच्छुकांचं विशेष लक्ष असतं. यंदाही ३१ मे रोजी १००० घरांसाठी सोडत काढण्याचं मुंबई मंडळाने जाहीर करत त्यानुसार घरांची शोधाशोध सुरू केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १००० घरांचा आकडा मुंबई मंडळानं कसाबसा गाठल्याचं समजतं आहे.


अत्यल्प गटासाठी ४०० घरं...

मुंबई मंडळानं शोधून काढलेल्या १००० घरांमध्ये गरीबांसाठी अर्थात अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरं असल्याचं समजतं आहे. १००० घरांमधील ४०० घरं अत्यल्प गटासाठी असून ३८० घरं अल्प गटासाठी असल्याची खात्रीलायक माहिती मिळतं आहे. मध्यमगटासाठी यंदाच्या लाॅटरीत २०० घरं असणार असून उच्च गटासाठी मात्र केवळ २० घरं असल्याचं समजतं आहे. ही घरं अॅन्टाॅप हिल, मानखुर्द, विक्रोळी आणि अन्य ठिकाणी आहेत.


म्हाडावर आरोप

अत्यल्प आणि अल्प गटाच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं याच मुख्य उद्देशाने म्हाडाची निर्मिती झाली आहे. असं असताना गेल्या काही वर्षांपासून याच गटासाठी कमी घरे लाॅटरीत समाविष्ट केली जात असून श्रीमंतांसाठीच लाॅटरीत काढली जात असल्याचा आरोप म्हाडावर होत आहे. गेल्या नोव्हेंबर २०१७ च्या लाॅटरीत तर अत्यल्प गटासाठी बोटावर मोजण्याइतकी म्हणजेच केवळ ८ घरं होती. त्यामुळे म्हाडा मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर मात्र म्हाडानं अत्यल्प गटासाठीच पुढची लाॅटरी असेल असं जाहीर केलं आणि त्यानुसार अखेर अत्यल्प आणि अल्प गटातील घरं मोठ्या संख्येनं शोधून काढल्याचं दिसत आहे.


दावा फुसका?

लाॅटरी ज्या दिवशी फुटणार त्या दिवसापासून ४५ दिवसांच्या आधी लाॅटरीची जाहिरात प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे. त्यानुसार १५ एप्रिलपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणं गरजेचं आहे. पण मुंबई मंडाळाची एकूणच लाॅटरीची तयारी पाहता १५ एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण आता १५ एप्रिलला मुंबई मंडळ जाहिरात प्रसिद्ध करत ३१ मेचा मुहूर्त साधते की म्हाडाचा ३१ मे च्या लाॅटरीचा दावा गेल्या वर्षीप्रमाणेच फुसका ठरतो हे आता लवकरच समजेल.



हेही वाचा-

गोरेगावमध्ये म्हाडाची ७००० घरं, एफएसआयमुळे २००० घरं वाढली

खूशखबर, गोरेगावातील ‘त्या’ जागेवर म्हाडा बांधणार ५ हजार घरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा