गिरणी कामगारांना टॉवर्स परवडेनात


SHARE

गिरणी कामगारांच्या संघर्षानंतर मुंबईतील 18 गिरण्यांमध्ये काम केलेल्या जवळ-जवळ 10 हजार गिरणी कामगारांना घरे मिळाली. मात्र घरे मिळाल्यानंतर या गिरणी कामगारांचे दुखणे अद्याप कमी झालेले नाही. श्रीराम मिलमध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीत या गिरणी कामगारांना घरे देण्यात आली. मात्र मालमत्ता करापोटी त्यांना 1760 रुपये दरमहा द्यावे लागतात तर देखभाल कर म्हणून 1400 रुपये द्यावे लागतात. या गिरणी कामगारांना वर्षाला 38,000 रुपये फक्त मालमत्ता आणि देखभाल करासाठी द्यावे लागतात.

म्हाडाने गिरणी कामगारांसाठी मोठमोठे टॉवर्स बांधले आहेत. मात्र या टॉवर्समुळे आता गिरणी कामगारांना जास्त पैसे दर महिन्याला मोजावे लागत आहेत. मुंबईमध्ये 500 चौ. फूट घरांना मालमत्ता कर आहे. मात्र गिरणी कामगारांची घरे लहान असतानाही रेडी रेकनरच्या हिशोबाने मालमत्ता कर द्यावा लागतो. तसेच देखभाल कर वेगळा द्यावा लागतो. 

कित्येक गिरणी कामगार मुंबईत घर मिळत आहे, म्हणून गावातील गाशा गुंडाळून पुन्हा मुंबईत आले, तर कित्येक गिरणी कामगारांची मुले अद्याप नोकऱ्या मिळवण्यासाठी चाचपडत आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालवलेल्या कुंटुंबांना या मालमत्ता कर आणि देखभाल कर भरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गिरणी कामगारांना या घरांमध्ये राहणे महागडे होत चालले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वेळ मागितली आहे. टॉवर्समुळे त्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे.

- दत्ता इसवलकर, अध्यक्ष, गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था

संबंधित विषय
ताज्या बातम्या