Advertisement

मल्टिप्लेक्स मालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट


मल्टिप्लेक्स मालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट
SHARES

मल्टिप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाॅटलला महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) नं जोरदार विरोध करत मल्टिप्लेक्स मालकांविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाविरोधात मल्टिप्लेक्स मालकांनी थेट उच्च न्यायालयाकडंही दाद मागितली होती. पण उच्च न्यायालयानं मालकांना थेट पोलिस ठाण्याचा पर्याय देत कोणताही दिलासा दिला नाही. त्यामुळं आता मल्टिप्लेक्स मालकांनी नरमाईची भूमिका घेत शनिवारी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.


८ दिवसांत  तोडगा

राज ठाकरे आणि मल्टीप्लेक्स मालकांमध्ये झालेल्या चर्चेनुसार ८ दिवसांत मल्टिप्लेक्स मालकांनी महागड्या खाद्यपदार्थांसह पाण्याच्या बाॅटलच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं आश्वासित केल्याची माहिती मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. त्यामुळं आता ८ दिवसांत मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ आणि पाणी स्वस्त होणार का हेच आता पाहावं लागणार आहे.


प्रेक्षकांमध्ये नाराजी 

मल्टिप्लेक्समध्ये पाॅपकाॅर्न २५० रुपयाला विकलं जात असून चहा-काॅफी इतकंच काय बाहेर १५-२० रुपयांमध्ये मिळणारा वडा-समोसा मल्टिप्लेक्समध्ये दुप्पट-तिप्पट किंमतीत विकला जातो. तर दुसरीकडं बाहेरच, घरचं जेवण, खाद्यपदार्थ, पाण्याची बाॅटल आत घेऊन जाण्यास मल्टिप्लेक्समध्ये मनाई असते. त्यामुळं नाईलाजास्तव प्रेक्षकांना महागडे खाद्यपदार्थ आणि पाणी विकत घ्यावचं लागतं. मल्टिप्लेक्स मालकांच्या याच मनमानी कारभाराविरोधात प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे.


न्यायालयाचा दिलासा नाही

प्रेक्षकांची नाराजी लक्षात घेता मनसेनं मल्टिप्लेक्सविरोधात मनसे स्टाईल आंदोलन सुरू केलं आहे. त्यातूनच पुण्यात मल्टिप्लेक्समधील कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी मनसैनिकांकडून मारहाणही झाली होती. तर या मारहाणीविरोधात मल्टिप्लेक्स मालकांनी न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयानं त्यांना कोणताही दिलासा दिला नव्हता.


सर्वसामान्यांची लुट थांबवा 

मल्टिप्लेक्स मालकांनी आता चर्चेतून हा प्रश्न सोडण्याचा निर्णय घेत शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी सर्वसामान्यांची लुट थांबवा असं म्हणत किंमती कमी करण्यास सांगितलं. त्यानुसार मल्टिप्लेक्स मालकांनी येत्या आठ दिवसांत पाण्याची बाॅटलसह चहा-काॅफी, वडा-समोसा आणि पाॅपकाॅर्नच्या किंमती प्रेक्षकांना परवडतील अशा करू असं आश्वासन दिल्याचं खोपकर यांनी स्पष्ट केलं आहे. 


...तर मनसे स्टाईल दणका

लहान मुलं आणि डायबिटीस रूग्णांसाठीही खाद्यपदार्थांची विशेष व्यवस्था करण्याचंही आश्वासन यावेळी देण्यात आलं आहे. या आश्वासनानुसार आठ दिवसांत पाण्याच्या बाॅटलच्या किंमतीसह खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्या नाही तरी पुन्हा मनसे स्टाईल दणका दिला जाईल, असंही यावेळी मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही वाचा - 

मराठमोळ्या युवराजची इंग्रजी सिनेमाकडे गरुडझेप!

‘बिग बॉस’मध्ये पहायला मिळणार पूल व्हाॅलीबाॅल




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा