Advertisement

मुंबई की दुर्घटनांचं शहर?


मुंबई की दुर्घटनांचं शहर?
SHARES

'ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जान' मुंबईवर आधारीत हे गाणं प्रत्येक मुंबईकर गुणगुणत असतो. गावी आणि खेडेगावात राहणारा प्रत्येक जण मुंबईत नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी येतो. त्यामुळं मुंबई ही कोणासाठी सोन्याची नगरी तर कोणासाठी स्वप्नांची नगरी आहे. मात्र, आताच्या काळात मुंबई ही खरचं स्वप्नांची नगरी राहिली आहे का?... असा प्रश्न मुंबईतील प्रत्येकालाच पडत आहे. याच कारण म्हणजे मुंबईत सतत घडणाऱ्या दुर्घटना. या दुर्घटनांमुळं देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईची सर्वाधिक दुर्घटनांचे शहर म्हणून नवीन ओळख होऊ लागली आहे. यंदा मुंबईत पादचारी पूल, संरक्षक भिंत, इमारत कोसळल्याच्या मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले.

मानवी जीवन कसं कवडीमोल आहे, याची प्रचिती आणून देणाऱ्या मोठ्या दुर्घटना मुंबईत घडल्यात. वर्षाच्या सुरूवातीलाच सीएसएमटी येथील हिमालय पादचारी पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला तर ३० हून अनेकजण जखमी झाले. त्यानंतर नुकतंच मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये ३० निष्पापांचा बळी गेला तर ७० हून अधिक जण जखमी झाले. तसंच, नुकताच घडलेल्या डोंगरीतील केसरबाई या ४ मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले. या दुर्घटनांनतर सर्व जखमी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. तर सरकारी यंत्रणा आणि विविध संस्थां जबाबदारी झटकत आहेत, असं होणं म्हणजे मुंबईला कोणी वाली उरला नसल्याची लक्षणं आहेत.

या महानगरात रहायचं असेल तर, अहोरात्र काम करायचं. वाढत्या वाहनांमुळं वाहतुकीचं हाल आणि वाढलेल्या घरांच्या किंमतीमुळं राहण्याचेही हाल सोसायचे. एवढं करूनही त्यांच्या जिवांची मात्र कुणी पर्वाही करत नाही. नोकरी-धंदा करणाऱ्या सामान्य मुंबईकराचा रस्त्यांवर, पावसात, दरडीखाली, भिंतीखाली, अपघातात आणि उघड्या गटारांमध्ये पडून मृत्यू होत आहे. या दुर्घटना घडल्यानंतर सर्व राजकीय नेते घटनास्थळी जाऊन चौकशी करतात आणि ठरलेलं ब्रीद वाक्य बोलतात. ते म्हणजे 'दोषींवर कारवाई करण्यात येईल'.

मुंबईत कोणतीही दुर्घटना घडली की, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते. पण या आर्थिक मदतीने गेलेला संसार, मुलाचं प्रेम, बापाचं आणि आईचं प्रेम परत मिळत नाही. तर राजकीय नेत्यांपासून सर्व अधिकारी 'दोषींवर कारवाई केली जाईल', असं म्हणतात. मात्र, कोणीच या दुर्घटना घडू नये यासाठी प्रयत्न करत नाहीत.

पावसाळ्यात दरवर्षी मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी तुंबतं. त्यामुळं होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं. तर अनेकदा याच साचलेल्या पाण्यामुळं रस्त्यातील उघड्या गटारांचा अंदाज न आल्यानं अनेकजण नाल्यात वाहून जातात. त्यानंतर महापालिका, अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस आणि इतर यंत्रणा त्यांच्या शोधकार्याला सुरुवात करतात. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. होत्याचं नव्हतं होतं. नुकताच दोन वर्षांचा दिव्यांश गोरेगाव-मालाड परिसरातील उघड्या मॅनहोलमध्ये पडला. तीन दिवस उलटून गेले तरी देखील त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर ७ वर्षीय मुलगा सुमित मुन्ना जैसवाल धारावीच्या राजीव गांधी कॉलनीत पिवळा बंगला परिसरातील नाल्यात पडला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

मुंबईत गेल्या साडे पाच वर्षात मुंबईत आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये झाडे आणि झाडांच्या फांद्या पडणं. दरड कोसळणं. घर, घरांचे भाग, भिंती इमारती, इमारतींचे भाग कोसळणं, तडे जाणं. आग, शोर्टसर्किट, गॅस गळती, रस्त्यावर आॅईल पडणं, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणं. अपघात, लोक अडकणं या दुर्घटनांचा समावेश आहे.

पावसाळ्यात मुंबईत दरवर्षी एखादी तरी जुनी इमारत कोसळतेच. केवळ जुन्याच इमारती धोकादायक आहेत असं नाही. नव्यानं बांधलेल्या इमारतीही कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईत जुन्या इमारती हजाराच्या वर आहे. यामधील काही इमारती मोडकळीस आल्या आहेत, तर काही इमारतींच नाव अतिधोकादायक इमारतींच्या यादीत आहे. मात्र तरीही  इथं राहणारे रहिवाशी इमारत रिकामी करत नाही. याचं कारण म्हणजे मुंबईतील घरांच्या किंमती आणि ओढवलेली आर्थिक परिस्थीती. मुंबईत सुरू झालेल्या मोनो, मेट्रो यांसारख्या सुविधांमुळं घरांच्या किंमती गगनाला भिडल्यात. त्यामुळं हक्काचं घर घेणंही कठीण झालं आहे.

मुंबईत अनेक इमारतींच अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आलं आहे. दरवर्षी हजारो बेकायदेशीर इमारती बांधून महापालिकेचे भ्रष्ट अधिकाऱ्यांची संगनमतानं बांधकाम केलं जातं. बेकायदेशीर बांधकाम टाळण्यासाठी किंवा निष्कासित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, बेकायदेशीर बांधकाम हे जसंच्या-तसं आहे. महानगरपालिकेला अवैध बांधकामावर दरवर्षी १५ हजारापेक्षा जास्त नोटीस पाठवल्या जातात. त्यानंतर १० ते २० टक्केच बेकायदेशीर बांधकामावर निष्कासन कारवाई केली जाते. त्याचप्रमाणं, काही बेकायदेशीर बांधकामावर बोगस कारवाई देखील केली जाते. त्यामुळं मुंबईकरांच्या जीवाला धोका असलेल्या या बेकायदेशीर बांधकामांवर पालिका कधी कारवाई करणार? असा सवाल आता उपस्थित होतं आहे.

मुंबईत आॅक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत आगीच्या जास्त घटना घडल्या. मुंबई अग्निशमन दलाकडं या कालावधीत २९१७ दुर्घटनांची नोंद झाली आहे. यापैकी ९८५ ठिकाणी आग, घर पडण्याच्या ७० घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये एकूण २४ लोकांचा मृत्यू झाला. तसंच, नोव्हेंबर २०१८ मध्ये १ ते १५ तारखेपर्यंत सर्वाधिक म्हणजेच १२५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.  इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा नादुरुस्त असणं, वायरिंंग बंदिस्त नसणं, चिंचोळ्या गल्ल्या, अरुंद रस्ते, इमारतीबाहेरील रस्त्यावर वेडीवाकडी पार्किंग, अग्निसुरक्षेबाबत निष्काळजीपणा यामुळं आगीचा धोका वाढतो.

रेल्वे अपघातांच्या दुर्घटनाही मुंबईत दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. प्रवाशांची होणारी वाढ, लोकमधील गर्दी यामुळं प्रवाशांना धक्काबुक्की करत प्रवास करावा लागतो आहे. काही वेळी महत्वाच्या ठिकाणी निश्चित वेळेत पोहोचण्यासाठी प्रवासी दारात उभं राहून प्रवास करतात. परंतु, अशावेळी तोल गेल्यानं रुळांवर पडून मृत्यू होतो. तसंच, लोकलमधील चोरीच्या घटनेतही वाढ होत असून, अनेक प्रवाशांनी चोराला पकडण्याच्या नादात जीव गमावला आहे. सध्या मुंबईतील रेल्वे स्थानकातील बहुतांश पादचारी पूल धोकादायक घोषित करून वापरासाठी बंद करण्यात आले आहेत. तर, काही स्थानकांतील छतांच्या दुरूस्तीचं कामं सुरू आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणं, पादचारी पूल बंद असल्यानं पर्यायी पूलांवर प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण होत असून, चेंगराचेंगरीची घटना होण्याची शक्यता आहे.  

मुंबईतील ही परिस्थिती बदलायची असेल तसंच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये असं वाटत असेल, तर सरकारलाच पुढाकार घेऊन कठोर नियम व कायदे लागू करावे लागतील आणि त्यांचा भंग करणाऱ्यांना किमान कालावधीत कठोर शिक्षा होईल याची खातरजमा करावी लागेल. मात्र हे कधी होणार याबाबत शंका आहे.



हेही वाचा -

जागा वाटपावरून युतीत पुन्हा कलगीतुरा?

शिवाजी मंडई ऐरोलीला हलवणार? मासे विक्रेत्यांची राज ठाकरेंकडे धाव



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा