Advertisement

साकीनाका मॅनहोल दुर्घटना: चार पालिका अधिकाऱ्यांचे निलंबन

मृताच्या कुटुंबाला १० लाखांची मदत

साकीनाका मॅनहोल दुर्घटना: चार पालिका अधिकाऱ्यांचे निलंबन
SHARES

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच मृताच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी चौकशी समिती स्थापन केल्याचे सांगितले.

महापौर तावडे म्हणाल्या, "रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी काही मॅनहोल उघडण्यात आले होते. त्या ठिकाणी संरक्षणात्मक झाकण बसवण्याचे काम सुरू असतानाच अस्लम शेख यांचा अपघात झाला. या कामासाठी दोन वर्षांपूर्वी निविदा काढण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी आता होत होती."

या प्रकरणात संबंधित वॉर्ड अधिकारी, सहाय्यक अभियंता (AE), उपअभियंता (Sub Engineer) आणि कनिष्ठ अभियंता (JE) अशा चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी साकीनाका येथील खैराणी रोडवरील सनमान हॉटेलजवळ अस्लम शेख हे मोबाईलवर बोलत पायी जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली.

दुरुस्तीच्या कामामुळे गटार उघडे ठेवण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे गटारातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते वाहून गेले.

घटनेनंतर अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी शोधमोहीम राबवली. काही वेळानंतर अस्लम शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, पावसाळ्यात उघडे मॅनहोल, पाणी साचणे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत महापालिकेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा