Advertisement

धुलिवंदनाच्या दिवशी टवाळखोरी कराल, तर तुरूंगात जाल!

मुंबईत बुधवारी होळी आणि धुलिवंदनानिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

धुलिवंदनाच्या दिवशी टवाळखोरी कराल, तर तुरूंगात जाल!
SHARES

मुंबईत बुधवारी होळी आणि धुलिवंदनानिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. धुलिवंदनाच्या दिवशी टवाळखोरांकडून अनोळखी व्यक्तीवर रंग टाकणं, फुगे मारणं, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, महिलांची छेड काढण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. या घटनांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी टवाळखोरांवर थेट गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.  


विशेष पोलिस बंदोबस्त

होळी आणि धुलिवंदनाच्या आनंदावर अनुचित प्रकारांचं विरजण पडू नये म्हणून यावर्षी सुरक्षेसाठी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांच्या विशेष गाड्या सतत गस्त घालणार असून, तळीरामांना आवर घालण्यासाठी विशेष नाकाबंदी मोहिमही हाती घेण्यात येणार आहे. महिलांवर रंग टाकणं, त्यांची छेड काढणं यावरून अनेकदा वादांना तोंड फुटतं. 

विशेषतः रेल्वे, बस, एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांवर रंगाचे फुगे मारण्यात येतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांकडून प्लॅटफाॅर्म आणि संवेदनशील भागांवर खास लक्ष ठेवलं जाणार आहे. तसंच साध्या वेशातील पोलिसही पाळत ठेवणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर,  रंगानं भरलेले फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर संबधित गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेऊन कारवाई केली जाईल. 


ड्रोनची नजर

दहावीची  परीक्षा सुरू असल्याने मोठ्या आवाजात स्पीकर लावू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसंच जबरदस्तीनं होळीची वर्गणी गोळा करणं, पेट्रोल, अॅसिड, स्फोटक पदार्थ इत्यादींचा अनधिकृतरित्या साठा करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्याशिवाय महिलांचं गुड मॅार्निंग पथक, फिक्स पॉइंट आणि विशेष नाक्यांवर गस्त ठेवण्यात येणार आहे. अनेकजण धुलिवंदनाच्या दिवशी गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ, मार्वे, आक्सा, गोराई, या समुद्रकिनारी जमा होतात. तिथं संबधित पोलिस ठाण्यांकडून विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे. तसंच ठराविक चौपाट्यांवर ड्रोन आणि सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवलं जाणार आहे.  


झाडं तोडणाऱ्यांना शिक्षा

होळीच्या निमित्तानं शहरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड केली जाते. मद्यधुंद असवस्थेत असलेल्यांकडून इतरांचं साहित्य होळीत नेऊन टाकण्याचेही प्रकार घडतात. अशी कृत्यं करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.



 हेही वाचा -

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मनसेचं स्पष्टीकरण

साधा माणूस ते मुख्यमंत्री




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा