Advertisement

साधा माणूस ते मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री, भाजपाचे एक प्रमुख नेते आणि नेहमीच आपल्या साधेपणासाठी ओळखले जाणारे मनोहर पर्रिकर यांचं स्वादुपिंडच्या कर्करोगाने निधन झालं. वयाच्या अवघ्या ६४ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरच श्वास घेतला.

साधा माणूस ते मुख्यमंत्री
SHARES
Advertisement

गोव्याचे मुख्यमंत्री, भाजपाचे एक प्रमुख नेते आणि नेहमीच आपल्या साधेपणासाठी ओळखले जाणारे मनोहर पर्रिकर यांचं स्वादुपिंडच्या कर्करोगाने रविवार सांयकाळी निधन झालं. वयाच्या अवघ्या ६३ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरच श्वास घेतला. आपल्या करकिर्दीत गोव्यात अनेक बदल घडवून आणणाऱ्या आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या पर्रिकर यांचा एक साधा माणूस ते मुख्यमंत्री हा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया.... 


आयआयटी पदवी घेतलेला मुख्यमंत्री

मनोहर पर्रिकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्यातील म्हापसा गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील गोपाळकृष्ण पर्रिकर आणि आई राधाबाई पर्रिकर यांच्या सहवासात त्यांचं बालपण गेलं. मडगावच्या लॉयला हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मराठीतून गोव्यातील एका शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर १९७८ साली त्यांनी आयआयटी मुंबईतून त्यांनी धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. विशेष म्हणजे आयआयटी पदवी ग्रहण केलेलं मनोहर पर्रिकर हे पहिले मुख्यमंत्री होते. 


राजकारणी नेतृत्व

विद्यार्थी दशेतच मनोहर पर्रिकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश घेतला. त्यांचे राजकारणाप्रती प्रेम, राहणीमानातील साधेपणा, काटेकोर शिस्तीचं पालन करणारे पर्रिकर यांची वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी गोवा आरएसएसच्या संघचालकपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर वयाच्या ३८ वर्षी म्हणजे १९९४ साली पहिल्यांदा ते आमदार बनले. १९९४ साली राज्यात भाजपा सरकारच्या केवळ ४ जागा निवडून आल्या होत्या. परंतु अवघ्या ६ वर्षांत त्यांनी गोव्यात भाजपा सरकारची सत्ता आणली. तसंच १९९९ साली पर्रिकर यांनी गोवा विधानसभेचे विरोधी पक्षाचे प्रमुख पदावरही कार्यरत होते.


संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी 

मनोहर पर्रिकर यांनी २०००, २००५, २०१२, २०१४ असं सलग ४ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. पर्रिकर यांची कार्यक्षमता, काटेकोरपणा, कामाची जबाबदारी या कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४-१७ या काळात त्यांच्यावर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकाळातच सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देत ते पुन्हा गोव्यात परतले आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 

दरम्यान मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रिकर यांचं २००१ साली कॅन्सरच्या आजाराने निधन झालं. त्यांना उत्पल आणि अभिजात अशी दोन मुलं असून उत्पल याने अमेरिकेच्या मिशिगन स्टेट महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. तर अभिजात हा व्यावसायिक आहे. 


साधेपणा नेहमीचा

साधेपणासाठी विशेष ओळख असलेल्या मनोहर पर्रिकर हे अनेकदा गोव्यात स्कूटरवरून फिरत. त्याशिवाय ते फाईव्ह स्टार हॉटेल मधील चहापेक्षा बाहेर रस्त्यावर टपरीवरचा चहा पिणे पसंत करायचे. याबाबत बोलताना ते टपरीवर चहा प्यायल्याने आजूबाजूच्या सर्व गोष्टी समजतात, त्यामुळे प्रत्येक राजकारण्यांनी आजूबाजूची स्थिती जाणून घ्यायची असेल तर रस्त्यावर टपरीवर एकदा चहा प्यावा असं म्हणायचे. त्याशिवाय आपल्या दोन्ही मुलाच्या लग्नात हाफ शर्ट आणि साधी पॅट घालणारे पर्रिकर चर्चेचा विषय ठरले होते.


पुरस्काराने सन्मानित

मनोहर पर्रिकर यांना २००१ साली आयआयटी मुंबईतर्फे अल्युमिनी अवॉर्ड देण्यात आला होता. त्याशिवाय २६ ऑक्टोबर २०१८ साली स्वराज्य पुरस्कारही देण्यात आला होता. 


कर्करोगाने आजारी

गेल्या काही वर्षांपासून ते स्वादुपिंडचा कर्करोग झाल्यानं आजारी होते. त्यांच्या या आजारावर अमेरिकेत, दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याशिवाय मुंबईतील लीलावती रुग्णालयातही त्यांच्या काही काळ उपचार सुरु होते. या उपचारांना प्रतिसाद देत मनोहर पर्रिकरांनी कर्करोगावर मात केली होती. परंतु हा आजार पूर्णपणे बरा न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्ब्येत जास्तच खालावली होती. 

सर्वसामान्यांच्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. मनोहर पर्रिकर यांचा शांत स्वभाव, कधीही कुठल्या कार्यामध्ये मागे न हटलेले धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती. पर्रिकर नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, शिस्तबद्धपणा, नियमाचे पक्के, साधेपणा, प्रामाणिक, आणि लोकप्रिय राजकारणी म्हणून त्यांची विशेष ओळख होती.हेही वाचा -

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन

राज्यातील मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मानसंबंधित विषय
Advertisement