Advertisement

मलबार हिलवर लवकरच घेता येईल जंगल सफारीचा आनंद

वृक्षवल्लींनी नटलेल्या या टेकडीवर पर्यटकांना छोटेखानी जंगल सफर घडवण्यासाठी सुविधा उभारण्याचा निर्णय पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयानं घेतला आहे.

मलबार हिलवर लवकरच घेता येईल जंगल सफारीचा आनंद
SHARES

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला जगातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मानाचे स्थान आहे. त्यामुळेच देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईला भेट देत असतात. त्यामुळे मलबार हिल टेकडीवर लवकरच जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे. वृक्षवल्ली आणि वन्य जिवांना धोका होऊ नये याची काळजी घेऊन हे नवे पर्यटनस्थळ आकारास येणार आहे.

मलबार हिलवरील बी. जी. खेर मार्गावरील कमला नेहरू पार्कजवळून एक रस्ता टेकडीवरून थेट खाली गिरगाव चौपाटीवरील तांबे चौकात पोहोचतो. टेकडीवरील खाचखळग्यांचा त्रास होऊ नये म्हणून तिथं पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.

देखभालीअभावी काही पायऱ्यांचे नुकसान झाले आहे. वृक्षवल्लीतून ही मार्गिका जाते. भुरटे चोर, समाजकंटकांच्या भीतीमुळे फारशी मंडळी या वाटेला जात नाही. मात्र प्रेमीयुगुलांचा तेथे मोठा वावर असतो. यामुळे हा भाग पोलीस आणि पालिकेसाठीही डोकेदुखी बनला आहे.

वृक्षवल्लींनी नटलेल्या या टेकडीवर पर्यटकांना छोटेखानी जंगल सफर घडवण्यासाठी सुविधा उभारण्याचा निर्णय पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयानं घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पायऱ्यांची डागडुजी आणि वृक्षसंपदा आणि वन्यजीवांना धोका निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन उन्नत मार्गिका उभारण्यात येणार आहे.

या मार्गिकेवरून पर्यटकांना जंगल सफरीचा आनंद घेत अथांग समुद्राचे दर्शन घडेल. मुसळधार पाऊस पडल्यानंतर टेकडीवरून पाण्याचे लोट तांबे चौक आणि आसपासच्या परिसरात येत असतात. त्यामुळे सफरीची मार्गिका डोंगरावर उभारल्यास पावसाळ्यात तिला धोका निर्माण होऊ शकेल. त्यामुळे उन्नत मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मलबार हिल टेकडीवर विविध जातीचे साप, मुंगुस, सरडे यांबरोबरच निरनिराळ्या पक्ष्यांचा अधिवास आहे. सुमारे ७८० मीटर लांबीचा मार्ग असणार आहे. मलबार हिल टेकडीवरील गगनगिरी महाराज फाटा इथून या सफारीला सुरुवात होईल आणि सफर पूर्ण करून पर्यटक पुन्हा तिथं पोहोचतील.

जंगल सफर पूर्ण करून गिरगाव चौपाटीवरील तांबे चौक आणि बाबुलनाथ मंदिराजवळ बाहेर जाण्यासाठी मार्गिका उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी साधारण १० कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जंगल सफरीसाठी शुल्क आकारायचे की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.



हेही वाचा

वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यानच नवा पादचारी पूल

मुंबई पोर्ट ट्रस्टकडून नाविकांसाठी बंदरात 'सीफेरर सेंटर'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा