नर्स संपावर, रुग्ण वाऱ्यावर...

  Mumbai
  नर्स संपावर, रुग्ण वाऱ्यावर...
  मुंबई  -  

  मुंबईतील राज्य विमा निगम महामंडळाच्या कामगार रुग्णालयातील कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात वाद सुरू आहेत. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि परिचारिका गेल्या आठ दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे या संपाचा सर्वात जास्त फटका रुग्णांना बसत आहे.

  संप सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अतिदक्षता विभाग बंद करण्यात आला होता. त्यामुळे 26 वर्षीय निरज तिवारी या मुलाचा मृत्यू झाला. या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला इथले डॉक्टर देतात. साध्या रुग्णांची तपासणी केली जात असून शस्त्रक्रिया वा बाळंतपणासाठी आलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. दररोज या रुग्णालयात 35 ते 40 रुग्ण दाखल होतात. विनापरवानगी एका कर्मचाऱ्याची बदली केल्यामुळे या संपाला एवढे मोठे स्वरुप आले आहे.

  गेल्या 8 दिवसांपासून या रुग्णालयात फक्त आपातकालीन रुग्णांनाच सेवा दिली जात आहे. बाळंतपणासाठी आलेल्या रुग्णांना या रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नाही. त्यामुळे रुग्णांनीही राग व्यक्त केला आहे.

  राज्य विमा निगम महामंडळाचं कामगार रुग्णालय केंद्र सरकारचे आहे. 300 खाटा असलेले हे रुग्णालय फक्त 10 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. या रुग्णालयातील एकूण 120 परिचारिका संपावर आहेत.


  का उपसलं संपाचं हत्यार?

  औरंगाबाद या शहरात राज्य विमा निगम महामंडळाचा नवीन बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात अंधेरीतील एका कर्मचाऱ्याची परस्पर बदली केल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे संघटना विरुद्ध व्यवस्थापन असा वाद सुरू झाला आहे.


  या संपाविषयी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. पण, काहीच तोडगा निघालेला नाही. रुग्णालयातील ओपीडी विभाग आणि आपातकालीन विभाग सुरू आहे. फक्त इमर्जन्सी रुग्णांवर उपचार केले जात आहेत. बाळंतपणासाठी येणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरू राहणार आहे. फक्त त्या कर्मचाऱ्यांची परस्पर झालेली बदली रद्द करावी हीच मागणी आहे.

  - कैलाशचंद धयाल, उपाध्यक्ष, इएसआयसी नर्सेस असोसिएशन


  संघटनेचा संप हा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण ही बदली तात्पुरती केली गेली आहे आणि ती आळी-पाळीने केली जाणार आहे. त्यामुळे या बदलीत सर्वांचा समावेश असेल. परिचारिकांची संघटना रुग्णांचा विचार करत नाही, म्हणून त्यांनी संप पुकारला आहे. एका कर्मचाऱ्याची बदली ही खूप छोटी गोष्ट आहे, त्यामुळे संपावर जाण्याची गरज नाही. या संपामुळे फक्त रुग्णांचे नुकसान होत आहे. रुग्णालयातील आपातकालीन व्यवस्था सुरू आहे. दोन ते तीन महिन्यात बदली केलेली व्यक्ती पुन्हा या रुग्णालयात रुजू होणार आहे. त्यामुळे त्यांनी हा संप रुग्णांना त्रास देण्यासाठीच पुकारला आहे.

  - डॉ. राजीव गुरुमुखी, उपवैद्यकीय अधिकारी  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.