मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी

 Agripada
मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी
Agripada, Mumbai  -  

मुंबईत स्वाईन फ्लूमुळे आणखी एका महिलेचा जीव गेला आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात सोमवारी सकाळी या महिलेचा मृत्यू झाला असून या संदर्भात महापालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाला विचारणा केल्यावर त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या मृतांचे वाढते प्रमाण असताना महापालिका प्रशासन मात्र डोळेझाकपणाची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

मालाड येथील मालवणी गेट क्र.8 एमएचबी कॉलनी येथे राहणाऱ्या शिफा सय्यद (30) असे या महिलेचे नाव आहे. अनेक दिवसांपासून या महिलेला ताप येत होता. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करुनही प्रकृतीत सुधार होत नसल्याने या महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, तेथे तब्येत आणखी बिघडल्याने या महिलेचा मृत्यू झाला.

मुंबईत आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 211 रुग्णांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले आहेत. मुंबईबाहेरुन उपचारासाठी आलेल्या 34 रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा

मुंबईत जूनमध्ये 107 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद

मुंबईत स्वाईन फ्लू वाढतोय... आपण जबाबदार कधी होणार?


वैद्यकीय चाचणीत हा मृत्यू स्वाईन फ्लूमुळेच झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. याबाबत अधिक माहितीसाठी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भाचा अहवाल महापालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांच्याकडे सुपूर्द केल्याचे सांगितले. पण, या विषयी डॉ. मिनी खेतरपाल यांच्याशी संपर्क साधला असता स्वाईन फ्लूमुळे मुंबईत आणखीन एक मृत्यू झाल्याची कल्पना नसून पुढच्या 15 दिवसांत स्वाईन फ्लूचा एकत्रित अहवाल सादर केला जाईल, असे सांगितले.

स्वाईन फ्लूच्या रुग्णांची आणि मृत्यूंची वाढती आकडेवारी पाहता प्रशासन यांसदर्भात बोलायलासुद्धा नकार देत आहे. यावरून स्वाईन फ्लूसंदर्भात महापालिका प्रशासन गंभीर नसल्याने दिसत आहे.

Loading Comments