Advertisement

राज्यात एप्रिलमध्ये ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात एप्रिल २०२१ मध्ये ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला.

राज्यात एप्रिलमध्ये ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार
SHARES

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात एप्रिल २०२१ मध्ये ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला, अशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आलं, तर चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलअखेर ५२ हजार १६९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

मंत्री नवाब मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केलं आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपली शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचंही आयोजन करण्यात येतं.

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकेचं कौतुक, भाजप मात्र विरोधाचीच ढोलकी बडवतंय- महापौर

८९ हजार उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ८९ हजार ६६८ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. हे उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त जागांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसंच विभागाच्या ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे, असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

मुंबईतही रोजगार

एप्रिल २०२१ मध्ये विभागाकडे १९ हजार ०५५ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात ५ हजार ८०९, नाशिक विभागात २ हजार ७५७, पुणे विभागात ४ हजार ९९७, औरंगाबाद विभागात ३ हजार ३७०, अमरावती विभागात १ हजार १४४ तर नागपूर विभागात ९७८ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

एप्रिलमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ८ हजार २५९ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ३ हजार ९९५, नाशिक विभागात १ हजार ३०२, पुणे विभागात १ हजार ७५७, औरंगाबाद विभागात ८६९, अमरावती विभागात ३१४ तर नागपूर विभागात २२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

(over 8 thousand unemployed got a job in april 2021 in maharashtra says nawab malik)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा