SHARE

राणीबागेत नव्याने आगमन झालेल्या छोट्या पेंग्विन पक्ष्याला पिंजऱ्यातील घरट्यात ठेवण्यात आलं आहे. हे पिल्लू सुरुवातीचे दोन ते तीन महीने घरट्याच्या आतमध्येच राहणार आहे. त्यामुळे पेंग्विनचं दर्शन घेण्यास येणाऱ्या नागरिकांना या पिल्लाचं दर्शन मात्र घेता येणार नाही.


अंडे उबवण्याचा कालावधी?

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, भायखळा येथील निसर्ग शिक्षण केंद्रामधील हम्बोल्ट पेंग्विन कक्षामध्ये एकूण सात हम्बोल्ट पेंग्विन पक्षी प्रदर्शित करण्यायत आले आहेत. या पेंग्विनपैकी मोल्ट आणि फ्लिपर या पेंग्विन जोडीपैकी फ्लिपर या मादी पेंग्विन पक्ष्याने ५ जुलै २०१८ रोजी पेंग्विन कक्षामधील त्यांनी निवडलेल्या जागी तयार केलेल्या घरट्यामध्ये एक अंडे घातलं होतं. अंडे उबवण्याचा कालावधी सुमारे ४० दिवसांचा असतो. दोन्ही पालकपक्षी आळीपाळीने सदर अंडे उबवत होते.


कधी झाला जन्म?

१५ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री ८ वाजून ०२ मिनिटांनी अंड्यातून पेंग्विनचा जन्म झाला. दोंन्ही पालकपक्षी नवजात पिल्लाची उत्तमप्रकारे काळजी घेत आहेत. पिल्लाचं लिंग अद्याप समजलं नसून नजिकच्या कालावधीमध्ये डी.एन.ए. परीक्षणाद्वारे ते निश्चित करण्याकत येईल, असं पेग्विन पक्ष्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं


एकमेव प्राणिसंग्रहालय

या पेंग्विनसाठी नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. मधुमिता काळे आणि त्यांचे सहकारी पशुवैद्य आणि प्राणिपाल यांचं पथक दोन्ही पालकपक्षी आपल्या नवजात पिल्लाच्या प्रकृतीची सातत्याने काळजी घेत आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, हे हम्बोल्ट पेंग्विन पक्षी प्रदर्शित करणारे संपूर्ण देशभरातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. सदर हम्बोल्ट पेंग्विन पक्षी या ठिकाणी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नागपूर आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांचं विशेषतः डॉ. डी.एन.सिंग, सदस्य सचिव, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्लीे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.


हेही वाचा -

गुडन्यूज, राणीबागेत छोट्या पेंग्विनचं आगमन

संबंधित विषय
ताज्या बातम्या