एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीला एक वर्ष पूर्ण: परिस्थिती 'जैसे थे'

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना सकाळी मेणबत्त्या पेटवून प्रवाशांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचसोबत या दुर्घटनेनंतर रेल्वेने दिलेल्या आश्वासनांचं नेमकं काय झालं? यावरही प्रवाशांनी चर्चा केली, त्यातून रेल्वे स्थानक परिसरात परिस्थिती 'जैसे थे' असल्याचा सूरच अनेकांनी लावला.

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीला एक वर्ष पूर्ण: परिस्थिती 'जैसे थे'
SHARES

मध्य रेल्वेचं परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचं प्रभादेवी (एल्फिन्स्टन) स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेला आज शनिवारी एक वर्ष पूर्ण होत असून या घटनेच्या कटू आठवणी मुंबईकर अद्याप विसरले नाहीत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना सकाळी मेणबत्त्या पेटवून प्रवाशांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचसोबत या दुर्घटनेनंतर रेल्वेने दिलेल्या आश्वासनांचं नेमकं काय झालं? यावरही प्रवाशांनी चर्चा केली, त्यातून रेल्वे स्थानक परिसरात परिस्थिती 'जैसे थे' असल्याचा सूरच अनेकांनी लावला.
त्या दिवशी काय घडलं?

सकाळी साडेदहाच्या सुमारास मध्य मुंबईत पाऊस सुरू होता. त्यामुळं अनेक प्रवासी पुलावरच थांबले होते. अशातच, परळ आणि एलफिन्स्टन दोन्ही स्टेशनांवर एकापाठोपाठ एक लोकल ट्रेन येत होत्या आणि पुलावरची गर्दी वाढतच होती. अशातच, पुलाचा पत्रा तुटल्याचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. पुलाचा एक भाग कोसळत असल्याची अफवा पसरली आणि जो-तो बाहेर पडण्यासाठी धावत सुटला. त्यामुळंच ही चेंगराचेंगरी झाली.


अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

गेल्यावर्षी घडलेल्या या घटनेत बळी गेलेल्या अनेकांचे नातेवाईक या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. कटु आठवणी आणि पानावलेले डोळे यामुळे एकंदर संपूर्ण वातावरण शोकाकूल झालं होत. याच दुर्घटनेत १२ वर्षीय रोहित अंकुश परब याचाही मृत्यू झाला होता. अचानक ओढवलेल्या त्याच्या मृत्यूने परब कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला. रोहितचे वडील त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. अत्यंत भावूक होऊन त्यांनी आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहिली.


फेरीवाल्यांचं बस्तान

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांना रेल्वे स्थानक परिसराच्या १५० मीटर आत बसण्यास मज्जाव करण्यात आला. परंतु सद्यस्थितीत तरी बहुतेक रेल्वे स्थानक परिसर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी काबिज केलेले दिसत आहेत.


किती पूल बांधले?

पश्चिम आणि मध्य रेल्वेने वर्षभरात मुंबईत ३० नवे पादचारी पूल उभारल्याचा दावा केला आहे. परंतु हे पूल चुकीच्या ठिकाणी उभारल्याचा आरोप प्रवासी कार्यकर्ते सुभाष गुप्ता यांनी केला आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक १८६७ साली बांधण्यात आलं होतं, तर स्थानकातील फूटओव्हर ब्रिज १०४ वर्षे जुना होता.


हेही वाचा-

ठाण्यातील कोपरी पूल लष्कराने बांधवा, एकनाथ शिंदे यांची मागणी

मध्य रेल्वे मार्गावर आणखी २१० सीसीटीव्ही कॅमेरे

 

संबंधित विषय