Advertisement

'हिव'साळ्याचा हिसका! दादरच्या सेनापती बापट मार्गावर पुन्हा खड्डेदर्शन


'हिव'साळ्याचा हिसका! दादरच्या सेनापती बापट मार्गावर पुन्हा खड्डेदर्शन
SHARES

समुद्रात घोंघावणाऱ्या ओखी वादळामुळे गेल्या ३ दिवसांपासून ऐन हिवाळ्यात पावसाने मुंबईत हजेरी लावली. यामुळे मुंबईतील रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डेदर्शन व्हायला लागलं आहे. दादर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेरील सेनापती बापट मार्गावर फुल मार्केट परिसरात खड्डयांनी रस्त्यांला अक्षरश: गिळून टाकलं आहे. यामुळे महापालिकेच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.


खड्डे नेमके कुठे?

एरवी पावसाळ्यात खड्डयांचा सामना मुंबईकरांना करावा लागतोच. परंतु ओखीच्या वादळामुळे अचानक पडलेल्या किरकोळ पावसातही मुंबईच्या रस्त्यावरील खड्डयांनी पुन्हा तोंड वर काढलं. दादर पश्चिम भागातील केशव सूत उड्डाणपूलाच्या दक्षिण बाजूस सेनापती बापट मार्गावर मिनाताई ठाकरे मंडईसमोर (फुल मार्केट) मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचं दिसून येत आहे.



१ ते २ फुटांपेक्षा मोठे खड्डे

या मार्गावर आधीपासून खड्डे होतेच. परंतु सोमवारी संध्याकाळपासून कोसळलेल्या रिमझिम पावसाने खड्डयांचा आकार आणखी वाढवला. या मार्गावर १ ते २ फुटांपेक्षा मोठ्या आकाराचे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डयांमुळे वाहतुकीलाही अडथळीचा सामना करावा लागत आहे.

पावसाआधी पडलेल्या या खड्ड्यांकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने गेल्या २ दिवसांत पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्डयांची ही विवरं मोठी झाल्याचं स्थानिक रहिवासी संगम यादव यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.

याठिकाणी नेहमीच खड्डे असतात. त्यामुळे इथे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. पण अवकाळी पावसाने महापालिकेचं काम योग्य नसल्याचं पुन्हा स्पष्ट केल्याचा आरोप गौतम खिल्लारे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला.



महापालिकेकडून लवकरच सेनापती बापट मार्गाचं काम हाती घेतलं जाणार आहे. पण अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असतील, तर हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना त्वरीत सूचना दिल्या जातील.

- विनोद चिठोरे, रस्ते प्रमुख अभियंता, महापालिका


मात्र, सध्या या विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर तसेच महापालिकेचे सर्वच कर्मचारी चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीचे नियोजनात व्यस्त आहेत. त्यातच ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या विभागातील प्रत्येक कर्मचारी दिवसरात्र काम करत आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यास विलंब झाला असला तरी ते तातडीने बुजवण्याचं काम हाती घेतलं जाईल, असं चिठोरे यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा