Advertisement

डबेवाल्यांच्या मॅनेजमेंटने नेदरलॅण्डची राणी खूश!

नेदरलॅण्डच्या राणीनं आपल्या भारत दौऱ्यावर मुंबईच्या डबेवाल्यांना भेटायची इच्छा दर्शवली आणि ही इच्छा बुधवारी राणीनं पूर्णही केली. अंधेरी रेल्वे स्थानक इथं राणीने डबेवाल्यांची भेट घेतली.

डबेवाल्यांच्या मॅनेजमेंटने नेदरलॅण्डची राणी खूश!
SHARES

दररोज धावपळ आणि काबाडकष्ट करणाऱ्या डबेवाल्यांसाठी बुधवारचा दिवस खास ठरला. कारण डबेवाल्यांच्या भेटीसाठी थेट नेदरलॅण्डची राणी मॅक्झिमा आली होती. नेदरलॅण्डच्या राणीनं आपल्या भारत दौऱ्यावर मुंबईच्या डबेवाल्यांना भेटायची इच्छा दर्शवली आणि ही इच्छा बुधवारी राणीनं पूर्णही केली. अंधेरी रेल्वे स्थानक इथं राणीने डबेवाल्यांची भेट घेतली.




मॅनेजमेंट गुरू

दररोज सकाळ ते संध्याकाळ, कधीही सुट्टी न घेता धावपळ करत हजारो नोकरदारांचं पोट भरणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची बातच कुछ और आहे. पोटापाण्यासाठी डबे पुरवण्याचं काम करणाऱ्या या डबेवाल्यांनी सामाजिक भानही जपलं आहे. त्यातून रोटी बँकसह अनेक सामाजिक उपक्रम जमेल तसे डबेवाले पार पडतात. याच डबेवाल्यांची अांतरराष्ट्रीय पातळीवर मॅनेजमेंट गुरू अशीही ओळख असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटी डबेवाल्यांकडे आकर्षित होतात.



उत्साहात स्वागत?

नेदरलॅण्डची राणी बुधवारी ३० मे रोजी आपल्याला भेटायला येणार ही माहिती पोलिसांकडून केवळ एक दिवस आधी डबेवाल्यांना मुंबई पोलिसांकडून मिळाली. हातात वेळ कमी होता पण उत्साह दांडगा असल्यानं डबेवाले कामाला लागले. अगदी पारंपरिक, मराठमोळ्या पद्धतीनं राणीचं स्वागत करण्याचं डबेवाल्यांनी ठरवलं. त्यानुसार अंधेरी स्थानकावर डबेवाल्यांनी ढोल, ताशाची सोय केली, पण सुरक्षेच्या आणि इतर कारणांवरून ढोल ताशा वाजवता आला नाही. पण राणीचं स्वागत डबेवाल्यांनी अत्यंत जोशात केलं.


कामाची माहिती घेतली

राणीनं डबेवाल्यांची भेट घेत १५ ते २० मिनिटं गप्पा मारल्या. डबेवाल्यांचं काम नेमकं कसं चालतं, जेवणाचा डबा कसा असतो, डबा ठेवण्याचा लाकडी बाॅक्स कसा असतो? इतक्या बारीकसारीक गोष्टींची माहिती राणीनं डबेवाल्यांकडून करून घेतल्याची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी मुंबई लाइव्हला दिली.



डब्याची प्रतिकृती भेट

डबेवाला रोज डबे घेऊन सायकलवरून कसा जातो, याचं प्रात्यक्षिकही राणीनं पाहिलं. शेवटी राणीला डबेवाल्यांनी खास डबे आणि डबे पोहोचवण्याच्या लाकडी बाॅक्सची प्रतिकृती भेट म्हणून दिली.


सरकारचं डबेवाल्यांकडे दुर्लक्ष

या भेटीनं डबेवाले आनंदित झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं आपल्या कामाची दखल घेतली जात असल्याबद्दल मुके यांनी समाधान व्यक्त केलं. मात्र त्याचवेळी सरकारला आपल्याविषयी काहीही वाटतं नसल्याचं, आपल्या कामाची दखल सरकारकडून घेतली जात नसल्याचं म्हणत डबेवाल्यांनी खंत व्यक्त केली. घराच्या मागणीसह डबेवाल्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून या मागण्यांच्या चर्चेसाठीही कधी सरकार आपल्याला बोलवत नसल्याचं मुके यांनी सांगितलं.



हेही वाचा-

डबेवाल्यांकडून प्रिन्स हॅरीला मराठमोळा आहेर

आंबाविक्रीची स्मार्ट आयडिया! शेतकरी-मुंबईचे डबेवाले आले एकत्र



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा