Advertisement

कब्रस्तानाच्या जागेवर विद्यालंकारचे उच्च शिक्षण


कब्रस्तानाच्या जागेवर विद्यालंकारचे उच्च शिक्षण
SHARES

वडाळा अँटॉप हिलमधील विद्यालंकार महाविद्यालयाशेजारील असलेल्या कब्रस्तानचे आरक्षण बदलून तेथील जागेवर चक्क विद्यालंकारच्या वतीनेच केल्या जाणाऱ्या उच्च शिक्षणाच्या महाविद्यालयाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. आरक्षित कब्रस्तानची जागा बदलून खारफुटीच्या जागेवर हे आरक्षण टाकण्यात आले आहे. कब्रस्तानसाठी खारफुटीची जागा आरक्षित ठेवण्यात आली असली तरा ती तिवरांच्या जागेवर असल्यामुळे कब्रस्तानासाठी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यालंकार महाविद्यालयाला जागेचा लाभ मिळवून देण्यासाठीच कब्रस्तानचे आरक्षण बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या विकास आराखड्यात नगर भू क्रमांक 145, 151, 154, 155, 176, 179, 184 आणि 186 या मिठागराच्या जागेवर मुस्लिम दफनभूमीसाठी आरक्षण होते. परंतु हे आरक्षण बदलून नगर भू क्रमांक 117वर करण्यात आले आहे. महापालिकेने बदललेल्या आरक्षणामुळे कब्रस्तानची जागा विद्यालंकार कॉलेजच्या घशात घालून कब्रस्तानसाठी खारफुटीची जागा देण्यात आली असल्याची बाब विरोधी पक्षनेते रवी राजा आणि काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक सुफियान वणू यांनी पत्रकार परिषद घेऊन निदर्शनास आणली. कब्रस्तानचे आरक्षण बदलण्यास आपला विरोध नाही. परंतु कब्रस्तानचे आरक्षण बदलताना त्यावर विद्यालंकार कॉलेज हाय एज्युकेशन दाखवण्यात आल्यामुळे आपला विरोध आहे. त्यामुळे यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

कब्रस्तानसाठी एकूण 4.8 एकर जागा आरक्षित होती. परंतु त्यातील दीड एकर जागा ही विद्यालंकार कॉलेजच्या कब्जात असून त्याठिकाणी उद्यान बनवून ते त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे कब्रस्तानची जागा विद्यालंकार कॉलेजला देण्याचा डाव आधीपासूनच होता, म्हणूनच त्यांनी या जागेवर कब्जा केला होता, असा आरोप रवी राजा आणि वणू यांनी केला.

कब्रस्तानची जागा बदलून पुढील भागात त्याचे आरक्षण टाकण्यात आले असले तरी, त्या जागेवर कब्रस्तान बनू शकत नाही. प्रस्तावित कब्रस्तानच्या जागेवर तिवरांची झाडे आणि दलदल आहे. त्यामुळे तिवरांची कत्तल करून कब्रस्तान बनवणे हे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही. तसेच याठिकाणी टाटा कंपनीची प्रखर क्षमतेची वीजवाहक वाहिनी जात आहे. याबरोबरच येथून मोठा नालाही जात आहे. या सर्व कारणांमुळे पुढील शंभर वर्षातही याठिकाणी कब्रस्तान बनू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

सुमारे 15 लाख मुस्लिम बांधवांना बसवणार फटका

रे रोड येथील नारियल वाडीनंतर शिवडीमध्ये मुस्लिमांसाठी कब्रस्तान आहे. परंतु शिवडी ते वडाळा आणि थेट कुर्लापर्यंत कब्रस्तान नसल्यामुळे एकमेव अँटॉप हिलमधील कब्रस्तानवर भार पडत आहे. त्यामुळे विद्यालंकार कॉलेज शेजारील चार एकर जागेवर दफनभूमी करण्यासाठी 1991 पासूनचे आरक्षण होते. परंतु याठिकाणचे आरक्षण बदलून अन्य जागेवर टाकल्यामुळे हक्काच्या कब्रस्तानाची जागाच हातची गेली आहे. याचा फटका केवळ अँटॉप हिल, वडाळ्यातील मुस्लिम जनतेलाच बसणार नाही, तर आसपासच्या भागातून जे मुस्लिम बांधव अंत्यसंस्कारासाठी येत असतात, त्यांनाही बसणार आहे. त्यामुळे कब्रस्तानचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच ठेवले जावे, अशी आपली मागणी असल्याचे रवी राजा आणि सुफियान वणू यांनी सांगितले. याबाबत सभागृहात मुस्लिम जनतेतर्फे बदल सूचवून आरक्षण कायम ठेवण्यास भाग पाडले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा