पारसी कॉलनीचा हेरिटेज लूक बिघडणार?

  Dadar
  पारसी कॉलनीचा हेरिटेज लूक बिघडणार?
  मुंबई  -  

  हेरिटेज परिक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या दादर पूर्व मधील मंचेरजी जोशी कॉलनीसह (पारसी कॉलनी) तब्बल 80 रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या भागातील बहुतांश रस्ते हे निमुळते, चिंचोळे आणि अरुंद आहेत. त्यामुळे या रस्त्यांची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकासकांना फायदा करुन देण्यासाठी रस्ता रुंदीकरणाची ही नवीन शक्कल लढवली जात आहे. सेटबॅकच्या नावाखाली विकासकाला टीडीआरचा फायदा मिळवून देण्याच्या या प्रयत्नात पारसी कॉलनीची हेरिटेज ओळख संपवतानाच सर्व रस्त्यांना सावली देणाऱ्या झाडांची कत्तल केली जाणार आहे.

  मुंबईचा विकास करताना 9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करुन त्यांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या नगरविकास खात्याने रस्त्यांच्या या विकासाला गती देण्यासाठी रस्त्यांच्या सेटबॅकच्या बदल्यात विकास अधिकार हस्तांतरणाचा (टीडीआर) लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे नगररचना विभागाच्या या परिपत्रकानुसार महापालिकेच्या रस्ते वाहतूक विभागाच्या वतीने 9 मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते निश्चित करून त्याप्रमाणे विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

  नगररचना विभागाच्या परिपत्रकानुसार महापालिकेच्या एफ-उत्तर विभागातील तब्बल 80 अरुंद रस्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये दादर पारसी कॉलनीतीलच सुमारे 30 रस्त्यांचा समावेश आहे. शीव किल्ल्याशेजारच्या 5 ते 6 रस्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दादरमधील मंचरशी जोशी कॉलनीसह (पारसी कॉलनी) शीव किल्ल्याचा परिसर याचा पुरातन वास्तू क्षेत्र म्हणून महापालिकेने बनवलेल्या यादीत उल्लेख आहे. त्यामुळे पुरातन वास्तू वारसा असलेल्या या रस्त्यांचा विकास करताना येथील हेरिटेज लूकला बाधा दिली जाणार असल्याची चर्चा आहे.


  इंडियन जिमखान्यापासून सुरुवात

  माटुंगा पूर्व भागात अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी इंडियन जिमखान्यापासूनच सुरुवात केली आहे. इंडियन जिमखान्याशेजारी अरुंद रस्ते असतानाच याठिकाणी दोन उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. पण या इमारतींचा विकास करताना त्यांना रस्त्यांसाठी जागा राखीव ठेवण्याची अट न घालता महापालिका प्रशासनाने या टॉवरसाठी इंडियन जिमखान्याच्या मैदानाची जागा घेतली आहे. मैदानाच्या काही भागात रस्ता बनवून त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली.


  4 हजार रहिवाशांचा विरोध

  पारसी कॉलनीतील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पारसी कॉलनीतील सुमारे 4 हजार लोकांनी स्वाक्षरीद्वारे विरोध दर्शवला आहे. पारसी कॉलनी वसण्याआधी आमच्या पूर्वजांनी झाडे लावली. उद्याने, मैदाने बनवली. मग इमारतींचे बांधकाम केले. त्यामुळे आमच्या पूर्वजांची आठवण आणि ओळख, तसेच या कॉलनीचे अस्तित्व टिकवण्यसाठी आमचा लढा असल्याचे मंचेरजी जोशी कॉलनी रेसिडेंशिअल असोसिएशनचे शेरॉय दावेर यांनी स्पष्ट केले.

  या रस्ता रुंदीकरणात 3 उद्याने आणि मैदानांची जागा जाणार आहे. तसेच 80 वर्षांपूर्वीची काही जुनी झाडेही कापली जाणार आहेत. पारसी कॉलनी ही आधीच हेरिटेज क्षेत्रात मोडते. त्यामुळे हेरिटेजला बाधा आणून येथील हिरवळ नष्ट करण्याचा प्रयत्न असेल, तर आमचा याला विरोध आहे, असे दावेर यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात महापालिका आयुक्त, हेरिटेज अध्यक्ष, विकासनियोजन प्रमुख अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष आणि गटनेते या सर्वांची भेट घेऊन रस्त्यांच्या रुंदीकरणाला विरोध दर्शवला असून त्यानंतरही जर महापालिका या निर्णयावर ठाम असेल तर येथील सर्व जनता महापालिकेच्या कार्यालयाखाली शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


  पारसी कॉलनीसह हिंदू कॉलनीतील सावली जाणार

  दादर हिंदू कॉलनी आणि पारशी कॉलनी या झाडांनी नटलेल्या आहेत. या कॉलनीतील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे असून या झाडांमुळेच कॉलनीत सावली पाहायला मिळते. पण रस्ते रुंदीकरणामुळे या झाडांचे अस्तित्वच नष्ट करत ही सावली घालवण्याचा प्रयत्न आहे. या भागात यापूर्वीही विकास झालेला आहे. त्यामुळे विकासाला कुठेही विरोध नाही. परंतु रस्ते रुंदीकरणामुळे झाडांची कत्तल होऊ नये ही आमची मागणी आहे. त्यातच या कॉलनी हेरिटेजमध्ये मोडत असून यामुळे येथील मोकळ्या जागा तसेच हिरवळही नष्ट केली जात असल्यामुळे आपण यात पुढाकर घेऊन येथील स्थानिकांचे म्हणणे महापालिका आयुक्तांसह महापौरांपर्यंत पोहोचवल्याचे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी स्पष्ट केले.


  इमारतींच्या मोकळ्या जागांच्या ठिकाणी रस्ते रुंदीकरण

  दादर पारसी कॉलनी हे हेरिटेज क्षेत्र असले, तरी त्याठिकाणी इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत कोणत्याही अडचणी नाहीत. 9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या शासन आदेशानंतर याबाबतचे धोरण मागील दोन ते चार महिन्यातच महापालिकेने बनवले आहे. याअंतर्गत ज्या इमारतींच्या आसपास मोकळ्या जागा आहेत, त्या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे ठरवले असल्याचे रस्ते प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी स्पष्ट केले. मात्र, एफ-उत्तर भागातील रस्ते विकासाची यादी तयार करून हेरिटेज समितीपुढे पाठवली आहे. त्यामुळे त्यांच्या अभिप्रायानंतरच विकासाची कामे हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  हे देखील वाचा - 

  मेट्रो 3 : आणखी 35 झाडांचा बळी?

  झाडांच्या कत्तलीसंदर्भातील तक्रारींसाठी न्यायमूर्तींची समिती स्थापन


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.