राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सातारा, सांगली, गोंदिया जिल्ह्यात कोरोना लस उपलब्ध नाही. त्यामुळे येथील लसीकरण पूर्ण थांबलं आहे. तर अनेक जिल्ह्यात एक ते दोन दिवस पुरेल इतकाच लस साठा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लसीकरण मोहीमही ठप्प होणार आहे. 

कोल्हापुरातील लसीकरण दिवसभरात कधीही ठप्प होऊ शकतं. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. एका आठवड्यात ९० हजार १४२ जणांना लस देण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण बुधवारी संध्याकाळपासून बंद आहे. येथे २ लाख ६० हजार लोकांचे लसीकरण झाले.  गोंदिया जिल्ह्यातील लसीकरण बुधवारपासून बंद आहे. आतापर्यंत १ लाख ८ हजार लोकांना लस देण्यात आली आहे. अमरावतीत तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. 

मुंबईतील ५० टक्के लसीकरण केंद्रे लस नसल्याने बंद आहेत. उद्या सर्व खाजगी लसीकरण केंद्र बंद होतील. तर परवापर्यंत संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होईल. मुंबईतील २६ खाजगी लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. 

महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. 



हेही वाचा -

मुंबई महापालिकेची नवी गाइडलाइन; आता 'या' गोष्टींनाच परवानगी

आता खासगी ऑफिसातही मिळणार कोरोना लस