Advertisement

'एमपीएस' शाळेवरून माझ्या बदनामीचं षडयंत्र- नगरसेविका राजूल पटेल

वाढीव मजल्याचं बांधकाम करताना वाढलेल्या खोल्या महापालिकेला मिळाव्यात या मागणीसाठी आग्रही असल्यानेच आपल्याविरोधात बदनामीचं षडयंत्र रचल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजूल पटेल यांना केला.

'एमपीएस' शाळेवरून माझ्या बदनामीचं षडयंत्र- नगरसेविका राजूल पटेल
SHARES

महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्ष यांना हाताशी धरून शिक्षण विभागाने चक्क मला बदनाम करण्याचं कटकारस्थान रचलं आहे. वाढीव मजल्याचं बांधकाम करताना वाढलेल्या खोल्या महापालिकेला मिळाव्यात या मागणीसाठी आग्रही असल्यानेच आपल्याविरोधात बदनामीचं षडयंत्र रचल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजूल पटेल यांना केला.

या बदनामीविरोधात स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भाजपाच्या सभा तहकुबीच्या खेळीत पटेल यांना हा मुद्दा नीट मांडता न आल्याने त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी तीव्र शब्दात चिड व्यक्त केली.


काय आहे प्रकरण?

ओशिवरातील आदर्शनगर इथं 'एमपीएस' ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होत आहे. ही जागा म्हाडाची असून ती प्राथमिक शाळेसाठी आरक्षित आहे. या परिसरात प्राथमिक शाळा नसतानाही इथं म्हाडाने बांधलेली शाळा खासगी शिक्षण संस्थेला देऊन टाकण्यात आली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागानेही त्याला परवानगी दिली. यासंदर्भात आपण २००७ पासून लढा देत असून खासगी संस्थेऐवजी महापालिकेनेच ही शाळा सुरु करण्याची मागणी आपण करत आहोत, असं पटेल म्हणाल्या.


चोरी उघड होणार म्हणून...

ही शाळा २ मजल्यांची बांधण्यात येणार होती. त्यामुळे महापालिकेला केवळ ६ वर्ग खोल्या मिळणार होत्या. पुढे या संस्थेने एफएसआयचा वापर करत या जागेवर ६ मजली इमारत बांधली. त्यामुळे वाढीव मजल्यांनुसार महापालिकेला वाढीव वर्गखोल्या मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. परंतु महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची ही चोरी उघड होईल या भीतीनेच पक्षामध्ये वाद निर्माण केला जात आहे. यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घेऊन आपली प्रतिम डागाळण्याचा प्रयतन केला जात असल्याचंही राजूल पटेल यांनी म्हटलं आहे.


घाईघाईत उद्घाटन

२०१७ ला निवडून आल्यावर मी तत्कालिन शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांना पत्र देऊन या वर्गखोल्यामध्ये महापालिकेची शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विद्यमान शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनाही याबाबत पत्र दिलं होतं. त्यानुसार त्यांनी या शाळेची पाहणी केली असता तिथं ना खुर्ची ना स्टाफ रुम असं चित्र दिसून आलं. परंतु आपलं पितळ उघडं पडेल म्हणून महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घाईघाईत उद्घाटनाचा घाट घातल्याचं त्यांनी सांगितलं.


अजून शाळा सुरू का नाही?

ही शाळा सुरुच झालेली नाही, तरीही आपण ती बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होता. परंतु या शाळेला २०१६ मध्ये मान्यता मिळाली असेल, तर शाळा अजूनपर्यंत सुरू का झाली नाही? असाही सवाल राजूल पटेल यांनी केला.


चौकशी करा, नाहीतर उपोषण

महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच हे षडयंत्र रचलं असून त्यात स्थानिक भाजपाचे आमदारही सामील असल्याचा आरोप राजूल पटेल यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आपण आयुक्तांच्या दालनात उपोषणाला बसू, असा इशारा पटेल यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही बुधवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांना निवेदन देऊन याठिकाणी शाळा सुरु करण्याची मागणी केली आहे.



हेही वाचा-

महापालिका शाळांमध्ये संगीतासह नृत्याचेही धडे

'नवीन शाळांना अनुदान नाहीच, हवं तर मुलांना पालिका शाळांमध्ये टाका'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा