Advertisement

महापौरांना निवासस्थान न मिळाल्यास... शिवसेना नगरसेवकांचा इशारा

येत्या काही दिवसांमध्ये प्रशासनाने दराडे कुटुंबाकडून बंगला ताब्यात घेऊन तो महापौरांकडे सुपूर्द न केल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महापौरांना निवासस्थान न मिळाल्यास... शिवसेना नगरसेवकांचा इशारा
SHARES

दराडे कुटुंबाने अडवलेला बंगला ताब्यात न घेता महापालिका प्रशासनाने महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाचं घोंगडं अजून भिजतच ठेवलं आहे. त्यामुळे महापौरांनी राहायचं कुठे? असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने नगरसेवकांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडू नये, असा इशारा शिवसेना नगरसेवकांनी बुधवारी दिला आहे. एवढंच नाही, तर येत्या काही दिवसांमध्ये प्रशासनाने दराडे कुटुंबाकडून बंगला ताब्यात घेऊन तो महापौरांकडे सुपूर्द न केल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.


स्थायीत प्रश्न उपस्थित

महापालिकेचा बंगला दराडे कुटुंबाने अडवल्यामुळे हा बंगला ताब्यात घेऊन तिथं महापौरांचं निवासस्थान व्हावं, अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत माजी महापौर विशाखा राऊत यांनी पुन्हा एकदा सुधार समितीच्या बैठकीत व्यक्त केली. दराडे कुटुंबांच्या निवासाची व्यवस्था करून महापौरांना बेघर करण्यात येत आहे. महापौर निवासस्थानाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिल्यामुळे आता ती जागा रिकामी करावी लागणार आहे. मग महापौरांनी रहायचे कुठे? असा प्रश्न राऊत यांनी केला.


सीआरझेडमधील जागा

शासनाकडून दराडे कुटुंबाला हा बंगला २०२८ म्हणजे निवृत्त होईपर्यंत देण्यात आला आहे. तर महापौरांसाठी शिवाजी पार्क येथील महापालिका जिमखान्याच्या जागेचा पर्याय दिला आहे. परंतु ही जागा सीआरझेडमध्ये येत असल्याने तिथं बांधकाम कसं होणार? असा प्रश्न उपस्थित होत अाहे. त्यामुळे महापौरांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था होणार नसेल तर आम्ही सर्व नगरसेवक आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या करू, असा इशारा राऊत यांनी दिला.


आयुक्तांच्या बंगल्याच्या जागी

या इशाऱ्याला माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी पाठिंबा देत नगरसेवकांकडून टोकाची भूमिका घेण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असं विचारलं. पर्यायी व्यवस्था होणार नसेल तर आयुक्तांच्या बंगल्यात महापौरांचं निवासस्थान व्हावं, त्याशिवाय ते जागे होणार नाहीत, असं जाधव म्हणाल्या.


पुढील बैठकीपर्यंत सांगा

महापौर निवासस्थानाबाबत सदस्य वारंवार बोलत असून प्रशासन याबाबत गंभीर नाही. हे बरोबर नसून आमची साधी दखलही घेऊ नये हे योग्य नाही. आमचे महापौर स्टंटबाजी करणारे नाहीत. त्यामुळे प्रशासनाने त्याचा फायदा उठवू नये, असं सांगत सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी पुढील बैठकीत याबाबतचा ठोस निर्णय सांगावा, असे आदेश प्रशासनाला दिले.



हेही वाचा-

शिवाजी पार्ककरांनो, महापौर निवासस्थानात डोकवायचे नाही हा!

दराडे कुटुंबांनी अडवलेला बंगला महापालिका परत घेणार, गटनेत्यांच्या सभेत निर्णय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा