Advertisement

अमरापूरकर मृत्यू प्रकरण : सिंघल समितीची महापालिकेला क्लिनचिट


अमरापूरकर मृत्यू प्रकरण : सिंघल समितीची महापालिकेला क्लिनचिट
SHARES

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या सिंघल समितीने ३६ पानांचा अहवाल सादर केला. परंतु या अहवालात कोणताही ठोस निष्कर्ष न काढता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अपेक्षित क्लिनचिट दिली आहे. सिंघल यांनी आपल्या अहवालात या घटनेची कारणे शोधण्याऐवजी जनजागृती करण्याच्याच शिफारसी केल्या आहेत.


ते मॅनहोल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडलेच नाही!

अतिरिक्त आयुक्त विजय  सिंघल यांनी केलेल्या चौकशी अहवालात जी-दक्षिण विभागातील पर्जन्यजल वाहिन्यांच्या कामाशी संबंधित असलेल्या कर्मचा-यांच्या निवेदनावरुन असे दिसून येते की, शंकर लक्ष्मण मटकर मार्गावरील ज्या मॅनहोलमध्ये डॉ. अमरापूरकर पडले, ते मॅनहोल महापालिका कर्मचा-यांनी उघडले नव्हते, असे या अहवालात नमूद करण्यात आले. तसेच पोलिस खाते व शंकर लक्ष्मण मटकर मार्गावरील दुकानदारांकडून प्राप्त झालेल्या सी.सी.टी.व्ही. चित्रफितीवरुन असा निष्कर्ष निघतो, की ४ ते ६ लोकांच्या जमावाने ते मॅनहोल उघडले होते. तसेच ते मॅनहोल बंद न करता ही सर्व माणसे जागेवरून निघून गेली. या बाबतीत पोलीस खात्याने पुढील चौकशी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असल्याचे सांगत महापालिकेने पोलिस कारवाईवरच हे सर्व सोपवले आहे.


चौकशी मॅनहोल्ससाठी, सूचना हवामान खात्याला

सिंघल यांच्या चौकशी समितीने चक्क हवामान खात्याला जबाबदार धरत, 'हवामान खाते हवामानाच्या अनुषंगाने जे अंदाज वर्तवते, त्यामध्ये मुंबई व कोकण यासाठी एकत्रित अंदाज वर्तवते; त्याऐवजी त्यांनी मुंबईसाठी वेगळा अंदाज वर्तवावा', अशीच शिफारस केली आहे. मुंबईसाठी अंदाज वर्तवताना त्यामध्ये देखील मुंबईतील ठिकाणे किंवा क्षेत्र निहाय अंदाज असल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या व हिताच्या दृष्टीकोनातून योग्य ती उपाययोजना करणे शक्य होईल, असे म्हटले आहे.  या अंदाजामध्ये पावसाचे प्रमाण, कालावधी, तीव्रता याबाबत ठिकाणनिहाय वस्तुनिष्ठ अंदाज हवामान खात्याकडून मिळाल्यास, आपत्ती व्यवस्थापन विषयक पूर्वतयारी अधिक परिणामकारकपणे करता येऊ शकेल.


मॅनहोल्समध्ये अंतर्गत लोखंडी झाकण

केतन कदम यांनी डिझाईन केलेल्या आणि सपाचे गटनेते रईस शेख यांनी शिफारस केल्याप्रमाणे लोखंडी जाळी मॅनहोल्सच्या आतील बाजूस बसवण्याची सूचना सिंघल यांनी केली आहे. मॅनहोलच्या झाकणाच्या ५ ते ६ इंच खाली एक जाळीदार झाकण बसवावे, जेणेकरुन जर मॅनहोलचे झाकण उघडे राहिले तरी त्यातून पाण्याचा निचरा होईल व जीवितहानी होणार नाही, असे त्यांनी अहवालात म्हटले आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement