डॉ. अमरापूरकर मृत्यू प्रकरण, चौघांना अटक


डॉ. अमरापूरकर मृत्यू प्रकरण, चौघांना अटक
SHARES

मुंबईत 29 ऑगस्टला झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. याच तुंबलेल्या पाण्यातून पायी जात असताना डॉक्टर अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या चौघांना दादर पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

राकेश कदम (28), दिनार पवार (36), नीलेश कदम (33) आणि सिद्धेश बेसलेकर (25) अशी या चौघांची नावे असून यातील तिघे त्याच परिसरातील चाळीत रहातात, तर दिनार पवार हा त्याच ठिकाणी असलेल्या इमारतीत रहात असल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली.

शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी या चौघांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने यां चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

भीषण पावसामुळे एल्फिंस्टन स्थानकाजवळील सेनापती बापट मार्गावर पाणी तुंबलेले बघून अमरापूरकर यांनी आपली गाडी सोडून पायी चालत जाणे पसंत केले. पण दुर्दैवाने पाण्याचा निचरा होण्यासाठी स्थानिकांनी उघडलेल्या मॅनहोलमध्ये अमरापूरकर पडले. त्यानंतर त्यांना शोधण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी दोन दिवसांनी वरळीला त्यांचा मृतदेह सापडला होता.

दीपक अमरापूरकर हे नावाजलेले गेस्ट्रो इंट्रोलॉजिस्ट होते. त्यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दादर पोलिसांनी केलेल्या तपासात या चौघांची नावे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

29 ऑगस्टाच्या पावसात या आरोपींच्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती, पाण्याचा जलद निचरा व्हावा म्हणून मॅनहोल उघडल्याची कबुली त्यांनी दिली, अशी माहिती दादर पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे 29 ऑगस्टाला मॅनहोल उघडताना नाम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या एका हवालदाराने यामधील एकाला हटकले होते. तेव्हा या सागळ्यांनी बीएमसीचे कर्मचारी असल्याची बतावणी केली होती. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून त्यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.


हेही वाचा - 

फायबरच्या झाकणाने घेतला अमरापूरकरांचा जीव?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा