
कोकणातून हापूस आंब्यांची आवक वाढल्याने नवी मुंबईतील (navi mumbai) वाशी एपीएमसी बाजारात हापूसच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.
नवशक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हंगामाच्या सुरुवातीला गगनाला भिडलेले दर आता काहीसे कमी झाले असून व्यापारी आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई (mumbai) महानगर क्षेत्रासाठी महत्त्वाचा फळबाजार असलेल्या वाशी APMC मध्ये सध्या दररोज सुमारे 50 हजार हापूस आंब्यांच्या पेट्या कोकणातून दाखल होत आहेत.
सुरुवातीला आवक उशिरा झाल्याने पुरवठा कमी होता, मात्र आता तो हळूहळू स्थिर होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सध्या हापूस आंब्याच्या एका पेटीची किंमत 1,500 रुपये ते 5,000 रुपयांदरम्यान आहे. आंब्याच्या (Mango) आकार आणि दर्जानुसार किंमत ठरते. एका पेटीत आंब्यांची संख्या आकारानुसार बदलते.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मर्यादित आवक असल्यामुळे हेच दर 8,000 रुपयांहून अधिक झाले होते. आता आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.
रत्नागिरी आणि देवगड या प्रमुख हापूस उत्पादक भागांतून मोठ्या प्रमाणावर आंबा बाजारात येऊ लागल्याने पुरवठा सुधारला आहे.
सध्या बाजारात येणाऱ्या आंब्यांची गुणवत्ता देखील चांगली असून त्यांचा केशरी रंग, सुगंध आणि परिपक्वता स्पष्ट दिसून येते.
यंदा कोकणातील हवामानातील बदलांमुळे आंब्याचा हंगाम सुमारे तीन आठवडे उशिरा सुरू झाला. हिवाळ्यातील अनियमित तापमानामुळे फुलोरा आणि काढणीवर परिणाम झाला, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
बाजारातील दर घटल्याचा परिणाम पुढील काही दिवसांत मुंबई (mumbai) आणि ठाणे (thane) परिसरातील बाजारातही दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आंबा तुलनेने स्वस्त दरात मिळण्याची अपेक्षा आहे.
दर सध्या कमी असले तरी 19 एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर पुन्हा काही प्रमाणात वाढू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तज्ज्ञांच्या मते, एप्रिलच्या अखेरीस आणि मेच्या सुरुवातीला आंब्याची आवक वाढेल. त्या काळात ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आंबा परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतो.
हेही वाचा
