गोवंडीत आता पाणी तुंबणार नाही!

  Govandi
  गोवंडीत आता पाणी तुंबणार नाही!
  मुंबई  -  

  गोवंडीतील रफीकनगर नाल्यावरील झोपड्यांचे अतिक्रमण दूर केल्यानंतर शुक्रवारी येथील आदर्शनगर नाल्यातील 47 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे कमलारमण नगर, शाहीनाका इत्यादी परिसरात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होणार आहे. त्यामुळे या भागात पाणी तुंबण्याची समस्या दूर होणार आहे.

  मुंबई महापालिकेच्या 'एम पूर्व' विभागात गोवंडी परिसरातील आदर्शनगर नाल्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. आदर्शनगर नाल्याच्या काही भागात झोपडीधारकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे नाले रुंदीकरणाचे आणि नालेसफाईचे काम करण्यास अडचणी येत होत्या. याबाबत परिमंडळ - 5 चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनात संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याठिकाणी असणाऱ्या 47 अनधिकृत झोपड्या हटवण्यात आल्या आहेत, अशी माहिती 'एम पूर्व' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली.

  आदर्शनगर नाला रुंदीकरणात आणि नालेसफाईमध्ये अडथळा ठरणाऱ्या 47 अनधिकृत झोपड्या हटवण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे 38 पोलीस कर्मचारी घटनास्थळी कार्यरत होते. महापालिकेचे 20 कामगार - कर्मचारी - अधिकारी देखील घटनास्थळी कार्यरत होते. या कारवाईसाठी 1 जेसीबी आणि 2 डंपर ही यंत्रसामुग्री वापरण्यात आली. महापालिकेच्या एम पूर्व विभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाईमुळे नाल्याचे रुंदीकरण आणि नालेसफाई अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्य होणार आहे. यामुळे कमलारमण नगर, शाहीनाका इत्यादी परिसरात पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल, असे किलजे यांनी स्पष्ट केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.