Advertisement

अखेर प्लास्टिक बंदीची अधिसूचना लागू!

लग्न आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलवर बंदी आहे. छोट्या पिण्याच्या पाणी बॉटलवर पूर्ण बंदी असून मोठ्या बॉटल बंदीसाठी ३ महिन्यांचा अवधी दिल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. ज्यांच्याकडे थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा आहे, त्यांनी मागणी केल्यास काही कालावधी वाढवून देण्यात येणार आहे.

अखेर प्लास्टिक बंदीची अधिसूचना लागू!
SHARES

राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशीरा जारी केली असून शनिवारपासून राज्यभरात या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक तसेच वन फलोत्पादनासाठी, कृषी व घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवीला यातून वगळण्यात आलं आहे. अधिसूचना लागू केल्याची माहिती शुक्रवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात दिली.


'बाटलीबंद'साठी ३ महिने

लग्न आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलवर बंदी आहे. छोट्या पिण्याच्या पाणी बॉटलवर पूर्ण बंदी असून मोठ्या बॉटल बंदीसाठी ३ महिन्यांचा अवधी दिल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. ज्यांच्याकडे थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा आहे, त्यांनी मागणी केल्यास काही कालावधी वाढवून देण्यात येणार आहे.


रोजगाराचा प्रश्न सोडवणार

या उद्योगात काम करणाऱ्या हजारो कामगारांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येणार असून त्यांचाही रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कदम म्हणाले. प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय देण्याबाबत महिला बचतगटांनी कापडी पिशव्यांचे उत्पादन सुरु केलं आहे. त्यांना ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. लवकरच कापडी पिशव्या बाजारात येणार आहेत. नाविन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक पालकमंत्र्यांनी काही निधी कापडी पिशवी बनविण्यासाठी बचतगटांना देण्याबाबत सांगितल्याची माहिती कदम यांनी दिली.


डिपॉझिट स्कीम

अधिसूचनेनुसार दुधासाठीच्या ५० मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टिक पिशव्यांना बंदीतून वगळण्यात आलं आहे. मात्र या पिशव्यांची पुनर्प्रक्रिया-पुनर्खरेदी पद्धती विकसित करण्यासाठी अशा पिशव्यांसाठी ग्राहकांनाच ५० पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. या पिशव्या दूध डेअरी, वितरक आणि विक्रेते यांना पुनर्खरेदी करणं बंधनकारक असेल.


पैसे परत मिळतील

ग्राहकाने दुधाची रिकामी पिशवी केल्यावर ग्राहकाला ते पैसे परत मिळतील. तसंच एक आणि अर्धा लिटरच्या प्लास्टिक बाटलीसाठीही एक आणि दोन रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. दुकानदार आणि विक्रेते यांना या बाटलीची पुर्नखरेदी करणे बंधनकारक असेल. बॉटल परत केल्यावर ग्राहकांना एक आणि दोन रुपये परत मिळतील. मात्र, जर ग्राहकाने दुधाची पिशवी व प्लास्टिक बाटली परत केली नाही, तर त्यांचे पैसे वाया जाणार आहेत.


कशावर बंदी?

थर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या ताट, कप, प्लेट्स, ग्लास, काटे-चमचे, वाटी, स्ट्रॉ, कटलरी, नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलेन बॅग, स्प्रेड शीट्स, पाऊच, वेष्टन यांचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री तसेच आयात व वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.


काय वगळलं?

औषधांच्या वेष्टनासाठी वापरलं जाणारं प्लास्टिक, वन आणि फलोत्पादन, कृषी, घनकचरा हाताळणी आदी कारणांसाठी लागणाऱ्या तसेच रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक आच्छादने (शिट्स्) यांना बंदीतून सूट. मात्र या उत्पादनांवर त्यांच्या वापराची माहिती ठळकपणे नोंदवणं आवश्यक असेल.



हेही वाचा-

मंत्रालयात उभारणार प्लास्टिक बॉटल्सवर प्रक्रिया करणारी मशीन

कापडी पिशव्यांसाठी मुंबई महानगरपालिकेला ५ कोटी देणार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा