Advertisement

गिरणी कामगारांना अर्जच भरता येईनात... सॉफ्टवेअरमध्ये सावळागोंधळ!


गिरणी कामगारांना अर्जच भरता येईनात... सॉफ्टवेअरमध्ये सावळागोंधळ!
SHARES

गिरणी कामगारांना घरांसाठी अर्ज करण्यासाठी म्हाडाकडून विशिष्ट सॉफ्टवेअर डिझाईन करण्यात आले आहे. मात्र या सॉफ्टवेअरमध्ये घोळ झाल्यामुळे अनेक गिरणी कामगारांना अर्ज भरता येत नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरचा उपयोग तरी काय, असा प्रश्न गिरणी कामगारांकडून विचारला जात आहे.

डिलाईल रोड येथे राहणारे अर्जुन बाबू सावंत हे गिरणी कामगार गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून गिरण्यांच्या जमिनींवरील गृहयोजनेसाठी गिरणी कामगार कल्याणकारी संघ्याच्या मदतीने अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा अर्ज भरलाच जात नसल्याचे चित्र आहे.

गिरणी कामगारांना अर्ज भरण्यासाठी म्हाडाने दिलेल्या पाच पुराव्यांपैकी एका पुराव्यानुसार, तिकीट क्रमांक 3 नोंदवत सावंतांनी अर्ज भरल्यानंतर अर्जुन बाबू सावंत या नावाऐवजी अर्जुन कोंडिबा सावंत या नावाने याआधीच अर्ज भरला गेल्याची माहिती समोर येते आणि अर्जुन बाबू सावंत यांचा अर्ज सॉफ्टवेअरकडून नाकारला जातो. अर्जुन बाबू सावंत हे मॉडर्न मिलचे कामगार असून अर्जुन कोंडिबा सावंत हे मधुसूदन मिलचे कामगार आहेत.


काय आहे हा सावळागोंधळ?

आपला अर्ज का भरला जात नाही, असा प्रश्न सावंत आणि कल्याणकारी संघ यांना पडला. त्यामुळे त्यांनी थेट म्हाडा कार्यालय गाठले. त्यावेळी सॉफ्टवेअरमध्येच मोठा सावळागोंधळ असल्याचे समोर आले.

तिकीट क्रमांक, पी.एफ. नंबर, ईएसआयसी नंबर, लाल पावतीसारख्या पुराव्यांपैकी एक पुरावा देत गिरणी कामगारांना अर्ज भरावा लागत आहे. त्यानुसार तिकीट क्रमांक हा शाळकरी मुलांच्या हजेरी क्रमाकांनुसार 1, 2, 3, 4 असा असतो. म्हणजेच, एका मिलसाठी तिकीट क्रमांक 1, 2, 3, 4, 5 असा असेल, तर दुसऱ्या मिलमधील गिरणी कामगारांसाठीही तिकीट क्रमांक 1, 2, 3, 4, 5 असा असतोच. त्यामुळे सॉफ्टवेअर तयार करताना प्रत्येक गिरण्यांसाठी तिकीट क्रमांकाचा पर्याय उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. 

पण याकडे म्हाडाचे दुर्लक्ष झाल्याने एखादा कामगार तिकीट क्रमांकानुसार अर्ज भरण्यासाठी गेला आणि त्याने तिकीट क्रमांक 3 नुसार अर्ज भरला, तर याआधी तिकीट क्रमांक 3 ने एखाद्या दुसऱ्या गिरणीमधील अर्जदारांनी अर्ज भरला असेल तर त्याच अर्ज भरलाच जात नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे सॉफ्टवेअरमधील या त्रुटींचा फटका सावंतसारख्या अनेकांना बसत असल्याची शक्यता आता कल्याणकारी संघाकडून व्यक्त होत आहे. सॉफ्टवेअरमधील हा मोठा गोंधळ आणि त्यामुळे कामगारांना बसणारा फटका कल्याणकारी संघाने म्हाडाच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यानुसार, संघाने मुख्य अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवत त्वरीत ही दुरुस्ती करण्याची मागणी केल्याची माहिती संघाच्या चेतना राऊत यांनी दिली आहे.


उठसूठ कोणीही भरतोय अर्ज...

म्हाडाच्या सॉफ्टवेअरमधील आणखी एक मोठी आणि महत्त्वाची चूकही कल्याणकारी संघाने निदर्शनास आणून दिली आहे. 1981 आणि 1982 अशी कट ऑफ डेट गिरणी कामगारांना अर्ज भरण्यासाठी आहे. म्हणजेच 1981 आणि 1982 नंतरचेच कामगार अर्ज भरू शकतात. त्यामुळे यासंबंधीच्या सॉफ्टवेअरमधील कोष्टकात 1981 आणि 1982 असेच दोन पर्याय उपलब्ध व्हायला हवे होते.

पण या सॉफ्टवेअरमध्ये 1900 पासून पुढे असा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे 1905 असो वा 1975, या काळात निवृत्त झालेले गिरणी कामगार आणि त्यांचे वारसही अर्ज भरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असल्याचा आरोप संघाने केला आहे. उठसूठ कोणीही अर्ज भरत असून पुढे हा कामगार अपात्र ठरणार आहे. त्यामुळे म्हाडाचेच काम विनाकारण वाढणार आहे. 

यातून भ्रष्टाचारालाही खतपाणी मिळणार असल्याचा संघाचा आरोप आहे. कारण, एखाद्या अपात्र विजेत्याला गुपचूप पात्र ठरवत त्याला घर दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हणत चेतना राऊत यांनी यावर आक्षेप घेतला आहे. म्हाडाने त्वरीत ही चूक सुधारावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



 हे देखील वाचा - 

31 जुलैपर्यंत भरता येणार गिरणी कामगारांना अर्ज



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा