Advertisement

अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्यासाठी दोन लाखांची काठी!

अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या काठीचा वापर करण्यात येणार असून, या एका काठीसाठी महापालिका प्रशासन दोन लाख रुपये मोजणार आहे!

अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्यासाठी दोन लाखांची काठी!
SHARES

आगीच्या दुघर्टनेसह आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. प्रसंगी त्यांना जीव द्यावा लागतो. त्यामुळे आता अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या काठीचा वापर करण्यात येणार असून, या एका काठीसाठी महापालिका प्रशासन दोन लाख रुपये मोजणार आहे!


अग्निशमन दलाच्या जवानांना अधिक सुरक्षा

विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्याची सुटका करण्यासाठी बऱ्याच वेळा अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात येते. दिवसाला सरासरी १२ ते १३ तक्रारी या अडकलेल्या पक्ष्यांना सोडवण्यासाठी येत असतात आणि त्या पक्ष्याला सोडवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान मोठ्या शर्थीने प्रयत्न करतात. परंतु, आजवर अशा प्रकारे अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे उपकरण नसल्यामुळे, बांबूच्या सहाय्याने किंवा घराचे छप्पर, इमारत किंवा झाडावर चढून अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करावी लागते. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालावा लागतो.


कार्बन फायबरचा रॉड दिमतीला

परंतु, आता अशाप्रकारे अडकलेल्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी कार्बन फायबर व फायबर ग्लास या पदार्थापासून बनवलेले व वजनाने हलके असणारे टेलिस्कोपिक रॉड बाजारात उपलब्ध असल्याने त्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रॉडच्या माध्यमातून जवानांना जीव धोक्यात न घालता पक्ष्यांची सुटका करणे शक्य होणार आहे. त्यामुळे एकूण ३४ अग्निशमन दल केंद्रांसाठी ३५ टेलिस्कॉपिक रॉड घेण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली आहे.


खरेदीसाठी ७७ लाख ५३ हजारांची तरतूद

हा रॉड इर्कान बनवाटीचा असून तो १६.५६ मीटर उंचीचा आहे. फायबरचा हा रॉड असल्यामुळे कोणत्याही विजेच्या तारेला लागल्यामुळे धक्का बसणार नाही. तसेच रॉडची उंची कमी जास्त करून त्याचा वापर करता येणार आहे. परंतु, या एका रॉडची मूळ किंमत ही १ लाख ६६ हजार ४०६ रुपये असून जीएसटी कराचा अंतर्भाव केल्यास प्रती नग ही फायरबरची काठी २ लाख १३ हजार रुपयांना पडत आहे. त्यामुळे या ३५ रॉडच्या खरेदीसाठी ७७ लाख ५३ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

मागील वर्षी महालक्ष्मी येथे कावळ्याचा जीव वाचवताना रेल्वेच्या तारांना चिकटून अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र नाराजी उमटली होती.



हेही वाचा

मुंबईच्या अग्निशमन विभागात 97 महिलांची निवड


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा