पालिका रुग्णालयांमध्ये वैद्यकीय आणि उपवैद्यकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरती भरती करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मंगळवारी दिले आहेत. कोरोनाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी आणि रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी पालिकेची सर्वोपचार रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि इतर रुग्णालयांमध्ये ही भरती केली जाणार आहे.
अतिदक्षताविषयक तज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वॉर्डबॉय व कामगार इत्यादी पदांवर तात्पुरती भरती करण्यात येणार आहे. भरतीचे अधिकार आयुक्तांनी संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता, उपायुक्त, कार्यकारी आरोग्य अधिकारी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक, साहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत. या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राची गरज लक्षात घेऊन आणि अर्जदारांकडे आवश्यक ती शैक्षणिक पात्रता व अनुभवाची खात्री करून नेमणुका कराव्यात, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
अतिदक्षताविषयक तज्ज्ञांना दरमहा दीड ते दोन लाख रुपये, एमबीबीएस. डॉक्टरांना दरमहा ८० हजार रुपये, बीएएमएस. डाॅक्टरांना दरमहा ६० हजार रुपये आणि बीएचएमएस. डॉक्टरांना दरमहा ५० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात येणाऱ्या परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर तंत्रज्ञांना दरमहा ३० हजार रुपये तर वॉर्डबॉय, कामगार इत्यादींना दरमहा २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
हेही वाचा -